मुंबई : एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांची मालिका काही संपताना दिसत नाही. त्यातच आता मलिकांच्या रडारवर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर आहे.त्यासाठी त्यांनी आणखी एक ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे.
क्रांती रेडकरच्या बहिणीवर पुण्यात ड्रग्जची केस नोंदवलेली आहे, पुण्यात ड्रग्जचे प्रकरण प्रलंबित असल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडेंनी या प्रकरणात उत्तर द्यावं, असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.
Sameer Dawood Wankhede, is your sister-in-law Harshada Dinanath Redkar involved in the drug business ?
You must answer because her case is pending before the Pune court.
Here is the proof pic.twitter.com/FAiTys156F— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 8, 2021
याबद्दल नवाब मलिक यांनी पुन्हा एक नवीन ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी काही स्क्रिनशॉट्सही जोडलेले आहेत. ट्वीटमध्ये मलिक म्हणतात, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. या ट्वीटसोबत त्यांनी या प्रकरणातले पुरावेही दिल्याचं सांगितलं आहे.
याविषयी आज सकाळी मलिक यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, मी माझं म्हणणं ट्वीटमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे. केस पुण्याच्या कोर्टामध्ये प्रलंबित आहे. हे खरं आहे का? आणि त्यांचा समीर वानखेडेंशी काय संबंध आहे? याचा खुलासा वानखेडेंनी केला पाहिजे.