पुणे – प्रलंबित मागण्या पूर्ण होण्यासाठी पुणे विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी काल (रविवार) मध्यरात्रीपासून पुणे विभाग बंदची घोषणा केली होती. त्यानुसार रात्री 12 नंतर पुणे विभागातील तेरा डेपो बंद झाले. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
संपाबाबत माहिती नसल्याने अनेक प्रवासी स्वारगेट स्थानकात येऊन परतत आहेत. स्वारगेट स्थानकात बाहेरून येणाऱ्या आणि स्वारगेट स्थानकातून बाहेर जाणाऱ्या सर्वच्या सर्व गाड्या बंद करण्यात आल्या आहेत.
स्वारगेट डेपोतील गाड्या एका जागेवर उभ्या करण्यात आल्या आहेत. तसेच आंदोलनामुळे काही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी येथे तैनात करण्यात आली आहे. स्वारगेट स्थानकातील आणि डेपोतील एसटीचे कर्मचारी स्वारगेट स्थानकात जमून जोरदार निदर्शने केली जात आहेत.