युक्रेनकडूनही मॉस्कोवर ड्रोनचा मारा
किव्ह – रशियाने आज पुन्हा युक्रेनची राजधानी किव्हवर ड्रोनचा जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात किमान एक जण ठार झाल्याचे समजते आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या या हल्ल्यामुळे किव्हच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा लागला.
रशियाने डागलेल्या ड्रोनमध्ये इराणी बनावटीची शाहेद ड्रोन होती. त्यापैकी 20 ड्रोन हवेतच पाडण्यात आल्याचे युक्रेनच्या हवाई संरक्षण विभागाने म्हटले आहे. गेल्या 24 तासात रशियाने युक्रेनच्या राजधानीवर केलेला हा तिसरा ड्रोन हल्ला आहे. युक्रेनच्या अन्य भागांमध्ये डागण्यात आलेल्या 31 ड्रोनपैकी 29 ड्रोन युक्रेनने पाडल्याचा दावा युक्रेनच्या सुरक्षा दलांनी केला आहे.
दुसरीकडे युक्रेनने रशियाची राजधानी मॉस्कोवर देखील असाच ड्रोन हल्ला केल्याचा दावा रशियाकडून केला गेला. त्यामध्ये मॉस्कोतील काही इमारतींचे नुकसान झाले. दोघेजण जखमीू झाले असल्याचे समजते आहे. मात्र त्यांची दुखापत किती गंभीर आहे, हे समजू शकलेले नाही. मॉस्कोवर डागण्यात आलेल्या 5 ड्रोनना पाडण्यात आले आणि तर 3 ड्रोन हवेतच निष्प्रभ झाली. त्यामुळे त्यांच्यामुळे कोणतेही नुकसान झाले नाही, असे मॉस्कोच्या रहिवाशांनी म्हटले आहे.
मॉस्कोवर झालेल्या ड्रोन हल्ल्याबाबत युक्रेनकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. रशियाच्या भूभागामध्ये आतपर्यंत जाऊन ड्रोन हल्ला करण्याची युक्रेनची ही कदाचित पहिलीच वेळ असावी. युद्ध सुरू झाल्यापासून 15 महिन्यांपूर्वी युक्रेनने अशाप्रकारे ड्रोन हल्ला केला होता. तर रशियाने युक्रेनच्या राजधानीवर आणि अन्य शहरांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा सातत्याने हल्ला केला आहे.