इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ गटाचे प्रमुख नवाझ शरीफ यांना सार्वजनिक पद भूषवण्यास अपात्र ठरवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात “‘पीएमएल-एनने हालचाली सुरू केल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा फेरविचार करण्यात यावा, अशी याचिका पक्षाच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांच्या फेरविचाराचे विधेयक संसदेने मंजूर केले असून अधियक्षांनी त्याला मंजूरीही दिली आहे. त्यानंतर “पीएमएल-एन’ने ही फेरविचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना पनामा पेपर्स प्रकरणी 28 जुलै 2017 रोजी कोणत्याही सार्वजनिक पदावर राहण्यास आयुष्यभरासाठी अपात्र ठरवले आहे. पनामा पेपर्स प्रकरणी मुलाकडून मिळणारे वेतन दडवल्याबद्दल शरीफ यांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
पाकचे सरन्यायाधीश सरन्यायाधीश अता बंदियाल हे पक्षपाती असल्याचे मानले जात असल्यामुळे फेरविचारासाठी दाखल होणाऱ्या याचिकेवरील सुनावणीसाठी स्थापन होणाऱ्या पिठावर त्यांनी नियुक्ती घेऊ नये अशी विनंती गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी केली आहे.