बुलडाणा – देशासह राज्यात करोनाने थैमान घातले आहे. त्यातच करोना विषाणूने बुलडाणा जिल्ह्यात 24 व्यक्तींभोवती आपला फार्स टाकला होता. त्यामध्ये एक मृत झाल्यामुळे 23 रूग्ण करोनाशी झुंज देत होते. हे सर्व 23 रूग्ण आजच्या तीन रूग्णांसह करोनावर मात करण्यात यशस्वी झाले. त्यामुळे बुलडाणा जिल्हाही आता करोनामुक्त झाला आहे. यातून खऱ्या अर्थाने “गो करोना गो’ हा संदेश परिस्थितीचे सत्य प्रकट करतो आहे.
बुलडाणा जिल्ह्यात चितोडा (ता. खामगांव), देऊळगांव राजा येथे प्रत्येकी दोन, शेगांव, चिखली येथे प्रत्येकी तीन, सिंदखेड राजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे नऊ करोनाबाधित रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील पाच, शेगांव येथील तीन, चितोडा येथील दोन, चिखली येथील तीन, मलकापूर येथील चार, सिंदखेड राजा येथील एक आणि दे. राजा येथील दोन करोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. त्यामध्ये मुळचे कामठी जि. नागपूर येथील व बुलडाणा येथे असलेल्या तीन रूग्णांची आज भर पडली आहे. आज मूळचे कामठी जि. नागपूर व सद्यस्थितीती बुलडाणा येथील तीन रूग्ण बरे होवून स्वगृही परतले आहेत. अशाप्रकारे एकूण 23 रूग्ण बरे झालेले आहे.
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या. कन्टेन्टमेंट झोन, अनावश्यक बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई, गर्दी कमी करण्यासाठी योजलेले उपाय यामुळे जिल्हा करोनामुक्तीला साद घालू शकला.
आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज तीन रूग्णांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहे. त्यांना आनंदाने जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून बरे झालेल्या रूग्णांचे स्वागत केले. करोनावर मात केलेल्या तीनही रूग्ण समाधानाच्या भावमुद्रेत बाहेर पडले.