मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी शांत स्वभावाचा असला तरीही त्यालाही राग येतो. आयपीएलमधील सामन्यात मी धोनीचा तो अवतार पाहिला आहे. अर्थात जरी तो चिडला तरी त्यात संघाचे हित असते. सध्याच्या क्रिकेटमध्ये देखील धोनीसारखा निस्वार्थी खेळाडू आहे याचा अभिमान वाटतो की अशा खेळाडूच्या नेतृत्वाखाली मला चेन्नई सुपरकिंग संघाकडून खेळण्याची संधी मिळाली, अशा शब्दात मध्यमगती गोलंदाज मोहित शर्मा याने धोनीचे स्वभाव वैशिष्ट्य विशद केले आहे.
आयपीएल स्पर्धेत मोहित चेन्नईकडून खेळत होता. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेतील एका सामन्यातील किस्सा त्याने सांगितला व धोनीच्या या स्वभावाचेही दर्शन घडल्याचे व्यक्त केले. सनराइझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात एका निर्णायक क्षणी धोनीने मला गोलंदाजी करण्याची सूचना केली. मात्र, अचानक त्याने आपला निर्णय बदला व इश्वर पांडेला गोलंदाजी करण्यासाठी बोलावले. मात्र, मला हे ऐकूच आले नाही व मी पांडेकडून चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी रनअप मार्कवर गेलो. त्यावेळी धोनीने मला षटक टाकायला सांगितले असल्याचे पांडे म्हणाला पण पंचांनी आता गोलंदाज बदलता येणार नसल्याचे स्पष्ट केले. मीच हे षटक टाकले व पहिल्याच चेंडूवर हैदराबाद संघाच्या युसुफ पठाणला बाद केले. तरीही धोनी आनंदी दिसला नाही, असे मोहित म्हणाला.
हा सामना संपल्यावर धोनी मला व पांडेला तुम्ही दोघे मूर्ख आहात आणि कायम राहणार, असे म्हणाला. दुसऱ्या दिवशी भेटल्यावर धोनी गप्पा मारत होता. अखेर मीच त्याला सॉरी म्हणालो व चूक झाल्याचे स्पष्ट केले. तर तो काहीच बोलला नाही, मग त्याला विचारले की काल जे घडले त्यावर काहीच व्यक्त झाला नाहीस. सामन्यात जे काही घडते ते मैदानावरच विसरुन जातो आणी नंतर मी ती घटना लक्षातही ठेवत नाही असे त्याने सांगितले. धोनी चिडला असेल असे समजून मला व पांडेला रात्रभर झोप लागली नाही आणि हा माणूस सर्वकाही विसरुनही गेला होता. त्याच्या याच स्वभावामुळे तो यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो, अशा शब्दात मोहितने धोनीची महती सांगितली.