नवी दिल्ली : सिरम इन्स्टिट्युटच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. कोवोवॅक्स या करोना प्रतिबंधक लसीच्या लहान मुलांवरील चाचणीस तज्ज्ञांनी परवानगी देण्यासाठी नकार दर्शविला आहे. या लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातल्या चाचणीसाठीची परवानगी नाकारण्यात आली आहे. दोन ते १७ वर्षे वयोगटातल्या मुलांवर चाचणी करण्याची परवानगी सिरम इन्स्टिट्युटने मागितली होती.
सिरमने भारताच्या औषध नियंत्रकांकडे ही परवानगी मागितली होती. सिरमला एकूण ९२० लहान मुलांवर कोवोवॅक्स या करोना प्रतिबंधक लसीची चाचणी करायची होती. त्यापैकी ४६० मुलं १२ ते १७ वर्षे वयोगटातली होती. तर उरलेली २ ते ११ वर्षे वयोगटातली होती. १० ठिकाणी ह्या चाचण्या होणार होत्या.
Government panel recommends against allowing Serum Institute of India to conduct phase 2 & 3 clinical trials of Covavax #COVID19 vaccine on children of age 2-17 years: Sources pic.twitter.com/loOhzpjyFe
— ANI (@ANI) July 1, 2021
मात्र भारताच्या औषध नियंत्रक मंडळाच्या तज्ज्ञांच्या समितीने कोवोवॅक्सच्या चाचण्यांना परवानगी नाकारली. ह्या लसीला अद्याप कोणत्याही देशाने लहान मुलांसाठी मान्यता दिली नसल्याचे कारण देण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
करोनावरील ‘कोवोव्हॅक्स’ लसीचे उत्पादन गेल्या आठवड्यापासून सुरु झाले आहे. भारतात कोवोव्हॅक्स लसीला सप्टेंबरपर्यंत मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोवोव्हॅक्स दक्षिण आफ्रिका आणि ब्रिटिश व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. सप्टेंबर २०२० मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. २ बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती.