नवी दिल्ली : देशात करोनाची तिसरी लाट धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.त्या पार्श्वभूमीवर सर्वत्र मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लहान मुलांचे लसीकरण लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी केंद्राकडून प्रयत्न सुरु आहेत.
भारतीय औषध कंपनी झायडस कॅडिलाकडून १२ वर्षांपुढील मुलांसाठी लस तयार करण्यात आली असून केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली होती. दरम्यान झायडस कॅडिलाने लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे. लसीची तिसरी चाचणी पार पडल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.
झायडस कॅडिलाने औषध नियंत्रक महासंचालक कार्यालयाकडे (डीजीसीआय) अर्ज केला असून लसीच्या आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्याची विनंती केली आहे. लसीची तिसरी चाचणी पूर्ण झाली असून १२ वर्षाच्या पुढील मुलांसाठीची लस बाजारात आणू इच्छित आहे.
दरम्यान केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात झायडस कॅडिलाच्या लसीची चाचणी पूर्ण झाली असून मान्यता मिळाल्यानंतर लसीकरणास सुरुवात होईल अशी माहिती दिली होती.
महिन्याच्या सुरूवातीला लसीकरणाच्या धोरणात बदल करण्यात आल्यानंतर लसीकरण मोहिमेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यांना उत्तर देताना सर्वोच्च न्यायालयाने वर्षअखेरपर्यंत देशातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्याची योजना असल्याची माहिती दिली होती.
१८ वर्षांपुढील नागरिकांची एकूण लोकसंख्या ९३ ते ९४ कोटी असून त्यासाठी एकूण लसींच्या १८६ कोटी डोसची गरज असल्याचे केंद्र सरकारने सांगितले होते. सर्व वयोगटासाठी केंद्रावर पोहोचल्यानंतर लस देण्याची सुविधा निर्माण करण्यात आली असून यापुढे ऑनलाइन नोंदणी बंधनकारक नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयात सांगितले होते.