पुणे – गेल्या 24 तासांत शहरात 179 नवीन करोनाबाधित सापडले आहेत. तर दिवसभरात 77 जणांना डिस्चार्ज दिल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.
रविवारच्या बाधितांची संख्या मिळून शहरातील बाधितांची एकूण संख्या 4 हजार 782 वर गेली आहे. तर दिवसभरात करोनामुळे 7 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या 176 जणांची प्रकृती चिंताजनक असून, त्यातील 47 जणांना व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे.
ससून रुग्णालयात 21 वर्षीय तरुणाचा करोनाने मृत्यू झाला. त्याला न्यूमोनिया, श्वसनाचा त्रास झाल्यामुळे 22 मे रोजी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्याची नमुने तपासणी केली असता, अहवाल पॉझिटिव्ह आला. त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील एका बाधिताला केईएम रुग्णालयात दाखल केले होते. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य पाच जणांचा आज दिवसभरात उपचारादरम्यान मृत्यू झाला.