महामार्गावर लूटमार करणारी टोळी जेरबंद

वाहनचालकांना पाळत ठेवून लुटायचा फंडा उघडकीस

नगर (प्रतिनिधी) – नगर-मनमाड महामार्गावर वाहनचालकांना हत्याराचा धाक दाखवत लूटमार करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केली. या टोळीतील एका अल्पवयीन मुलासह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.

आरिफ गफुर शेख (वय-25 रा. अवघड पिंपरी ता. राहुरी), सागर गोरख मांजरे ( वय-24 रा. मतापुर ता. श्रीरामपूर), अविनाश श्रीधर साळवे (वय- 22 रा. राहुरी), सुखदेव गोरख मोरे (वय 23 रा. पिंपळवाडी रोड, राहता), चेतन राजेंद्र सणासे (वय- 19 रा.राहाता), अक्षय सुदाम माळी (वय-22 रा. राहाता ), अक्षय सुरेश कुलथे (वय-20 रा. राहुरी), सागर पोपट हरिश्चंद्रे (वय-22 रा. धामोरी खुर्द ता. राहुरी) यांच्यासह एक अल्पवयीन मुलगा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

या टोळीने 17 ते 21 मे दरम्यान नगर-मनमाड रस्त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी तीन वाहनचालकांना अडवून त्यांना हत्यारांचा धाक दाखवून त्यांची लूटमार केली होती. या प्रकरणी कोपरगाव व लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या लुटमारीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, शिशिरकुमार देशमुख, सहाय्यक फौजदार नाणेकर, मनोज गोसावी, दत्ता गव्हाणे, पोलीस नाईक रवींद्र कर्डिले, दीपक शिंदे, रवीकिरण सोनटक्के, संतोष लोढे, विशाल दळवी, रंजीत जाधव, राहुल सोळंके, मयूर गायकवाड, शिवाजी ढाकणे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, किरण जाधव, सागर सुलाने आदींच्या पथकाने टोळीतील आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून जेरबंद केले. अटक केलेल्या आरोपींवर नगर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांच्या वाहनावरही नजर

राहुरी येथील एका शेतात टोळीतील आरोपी रात्री एकत्र जमायचे. पहाटे तीन नंतर दुचाकीवरून नगर-मनमाड महामार्गाने रेकी करायचे. एकटे वाहन दिसले की लुटायचे. त्यानंतर वाहनचालकाने या घटनेची कुणाला माहिती देऊ नये यासाठी त्याचा मोबाईल फोडून टाकायचे. लुटमार होत असताना यांच्यातील एक आरोपी इतर वाहने व पोलिसांच्या गाडीवर लक्ष ठेवून असायचा.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.