श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील लाटे वस्तीवर शनिवारी (दि.23) सायंकाळी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एकजण जागीच ठार झाल्याने श्रीरामपूर तालुका हादरला आहे. गणेश गवळीराम साळवे (वय 28, रा. जोशी वस्ती, निपाणी वाडगाव) असे मयताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, लोटे वस्ती येथील वायकर व साळवे यांच्यात जागेवरू वाद होता. या कारणावरून त्यांच्यात काल सायंकाळी सात ते साडेसात वाजेच्या सुमारास पुन्हा वाद झाले. राजू गांगुर्डे, डॅडी वायकर, राजू वायकर, शरद वायकर यांच्यासह दहा ते बारा जण तलवार, गावठी कट्ट्यासह साळवे यांच्या अंगावर धावून गेले. त्यावेळी गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला.
साळवे यांच्या छातीत गोळी घुसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तेथील काही तरुणांनी त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात आणले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यावेळी रुग्णालयात मोठी गर्दी जमली होती. पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला होता.