15 जणांचा मृत्यू; दोन तरुणांचा समावेश
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा हाहाकार सुरूच असून आज दिवसभरात पुन्हा 1052 जणांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर तब्बल 15 जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका 29 वर्षीय व एका 32 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 642 वर पोहोचला असून, करोनाबाधितांची संख्या 31643 वर पोहोचली आहे.
मंगळवारी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांचा अहवाल आज (बुधवारी) महापालिकेला प्राप्त झाला. आजच्या अहवालानुसार शहरातील 1024 जणांना तर शहराबाहेरील 28 जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. तर आज मृत झालेल्यांमध्ये शहरातील 15 जणांचा समावेश आहे. आजच्या मृतांमध्ये भोसरी येथील एका 29 वर्षीय व थेरगाव येथील एका 32 वर्षी तरुणाचा समावेश आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तरुणांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढू लागले आहे.
आतापर्यंत शहरातील 22005 जण करोनामुक्त झाले असून, शहराबाहेरील 1262 जणांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. आज दिवसभरात करोनाची कोणतीही लक्षणे न आढळल्यामुळे 207 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 2460 जणांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. आज नव्याने संशयित असलेले 1627 जण महापालिकेच्या रुग्णांलयांमध्ये दाखल झाले आहेत. तर शहरातील 6130 आणि शहराबाहेरील 465 जणांवर महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.