वॉशिंग्टन -जगभरातील करोनाबाधितांची संख्या अवघ्या सहा आठवड्यांत दुप्पट झाली आहे. जगातील बाधितांची संख्या 1 कोटी होण्यास 6 महिन्यांचा कालावधी लागला. मात्र, त्या संख्येने 2 कोटींचा टप्पा पार करण्यास अवघे 6 आठवडे लागले.
जगातील करोनाबाधितांची संख्या सोमवारी 2 कोटींवर पोहचली. त्या संख्येत अमेरिका, ब्राझील आणि भारत या 3 देशांचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. ते देश बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानांवर आहेत. अमेरिकेत 53 लाखांहून अधिक बाधित आहेत. त्या देशात करोनाने सुमारे 1 लाख 68 हजार बाधितांचा बळी घेतला आहे.
ब्राझीलमध्ये 31 लाख बाधित असून 1 लाखहून अधिक बाधित दगावले आहेत. भारतातील बाधितांची संख्या 24 लाखांजवळ जाऊन ठेपली आहे. भारतात आतापर्यंत 46 हजारांहून अधिक बाधित मृत्युमुखी पडले आहेत. मागील काही दिवसांत अमेरिकेत दरदिवशी आढळणाऱ्या बाधितांच्या सरासरीत घट झाली आहे. तरीही ती 54 हजारांवरून अधिक आहे.
भारतातील सरासरी 59 हजार तर ब्राझीलमधील सरासरी 44 हजार इतकी आहे. बाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीतील पहिल्या दहांमध्ये रशिया, दक्षिण आफ्रिका, मेक्सिको, पेरू, कोलंबिया, चिली आणि स्पेनचा समावेश आहे. जगभरात करोनाने आतापर्यंत सुमारे 7 लाख 47 हजारांचा बळी घेतला आहे. आतापर्यंत 1 कोटी 34 लाखांहून अधिक बाधित करोनामुक्त झाल्याची बाब जगासाठी दिलासादायी ठरली आहे.