थेऊर : पुर्व हवेलीमध्ये कोरोनाचा प्रार्दुभाव झपाट्याने वाढत आहे. थेऊरमध्ये फक्त चार दिवसांमध्ये येथील स्थानिक नागरिकांपैकी सहाजण कोरोना रुग्ण आढळल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असून महसूल प्रशासनाचे तलाठी दिलीप पलांडे व ग्रामपंचायत यांच्यात तात्काळ झालेल्या बैठकीनुसार शनिवार २७ जूनपासून सलग तीन दिवस कडक लॉकडाऊन ग्रामपंचायत प्रशासनाने जाहीर केले आहे. त्यामुळे कोरोनाची संक्रमणाची साखळी तोडणेकामी नागरिकांनी शासकीय आदेशाचे काटेकोरपणे पालन करणेबाबत आवाहन करण्यात आले आहे.
२७ वर्षीय युवकाला करोना झाल्याने त्याचे संसर्गामुळे त्याचे वडील व तीन भाडेकरु नागरिक अशा पाचजणांना करोनाची लागण झालेली आहे. करोनाग्रस्त युवकाचे वडील भजनी मंडळात असल्याने त्यांच्या संसर्गामुळे भजनी मंडळातील एकजणास करोनाची लागण झाल्याने चार दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची एकूण संख्या सहा झाली आहे.
येथील स्थानिक कंपनीमध्ये बाहेरील एक कामगार सुरुवातीला करोनाबाधित आढळून आला होता. मात्र स्थानिक सहा नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. भजनी मंडळातील इतर सदस्यांनी क्वांरटाईन करुन घेतले असले तरी त्यातील काहीजणांनी अद्याप कोव्हिड १९ ची तपासणी करून घेतली नसल्याने कोरोनाचे संकट अद्यापही थेऊरवर घोंघावत आहे.
‘सलग तीन दिवस कडक लॉकडाऊन असल्याने दवाखाना व मेडिकल दुकाने वगळता सर्व व्यवहार पुर्णपणे बंद राहील. फक्त सकाळी 7 ते 9 यावेळी दुध डेअरी सुरू राहिल. तीन दिवसांमध्ये भाजीपाला विक्री व इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. नागरिकांनी सातत्याने मास्क वापरावयाचे असून यात कोणीही हलगर्जीपणा केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल.’
– बी.आर. कांबळे, ग्रामविकास अधिकारी थेऊर