नाशिक: मुंबईत 1992-मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातील आरोपी युसूफ मेमनचा आज नाशिकच्या कारागृहात मृत्यू झाला. तो 2018 पासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता, अशी माहिती तुरुंगातील अधिकाऱ्यांनी दिली. युसूफ मेमन हा टायगर मेमनचा भाऊ होता.
युसूफ मेमनच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे येथे पाठविण्यात आला आहे. युसूफ मेमनच्या मृत्यूची पुष्टी नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी दिली आहे.
1992-93 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण देश हादरला होता. या बॉम्बस्फोटात सुमारे 250 जणांना मृत्यू झाला होता.
तर काही हजार नागरिक जखमी झाले होते. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम यांच्यासमवेत टायगर मेमन हा स्फोटांच्या कटातील मुख्य सूत्रधार होता, तर युसूफवर मुंबईतील अल-हुसैनी इमारतीत त्याने फ्लॅट आणि गॅरेजला दहशतवादी कारवायांकरिता परवानगी दिल्याचा आरोप होता. याप्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
मेमन हा माहीम येथे राहत होता. त्याच्या घरात शक्तिशाली बॉम्ब बनवण्यात आले होते. यामुळे या खटल्यात टायगर मेमन याचे अख्ख कुटुंब हे आरोपी होते. यापैकी टायगर मेमन अजूनही फरार आहे. तर याकूबला फाशी देण्यात आली आहे. इसा, रुबिना, युसूफ हे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत.