शेवगाव ( प्रतिनिधी): राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या कंत्राटी आरोग्य सेविका विविध प्रकरचे लसीकरण, गरोदर मातांची नोंदणी आणि आरोग्याबाबत प्रबोधन या आपल्या नियमित कामाबरोबरच करोना महामारीच्या अस्मानी संकटाच्या काळात सर्व करोना योध्याच्या खांद्याला खांदा लावून लढल्या आहेत. समाजाची सेवा केली आहे तरीही त्या दूर्लक्षित राहिल्याची खंत या आरोग्य सेविकांनी व्यक्त केली.
अधिक काळापासून त्या अल्पशा मानधनावर राबल्या आहेत. तसेच सेवेत कायम करण्याचे आणि किमान वेतनश्रेणीत बसविण्याचे आपले गाऱ्हाणे त्यांनी अलीकडील काळात संयमशील मार्गाने मांडले आहे . या कंत्राटी आरोग्य सेविकानीही यावेळी प्रथमच गेल्या अकरा तारखेपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे . मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता, या अनुभवी सेविकांनी न्याय देण्याची मागणी केली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत २००६ पासून कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या आरोग्य सेविकाही या कामात कधी मागे राहिल्या नाहीत. त्यांनी या काळात नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. घरोघरी नवीन स्थलांतरित आलेल्यांची नोंद घेऊन त्यांच्या तंदूरीस्तीची काळजी घेतली आहे.
बाहेरगावाहून आलेल्या व्यक्तींच्या हातावर शिक्के मारून त्याना विलगीकरण कक्षात ठेवणे ही कामे त्यांनी केली आहेत. या व्यक्तींची सकाळ संध्याकाळ दोन वेळेस होणारी तपासणीही याच कंत्राटी आरोग्य सेविका करत आहेत. नवीन स्थापन केलेल्या कोविड केअर सेंटर मध्येही त्यांच्या नियुक्त्या केल्या गेल्या आहेत.
तसेच अन्य नियमित आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रजेच्या सुट्टीच्या आणि रिक्त पदाच्या काळात व मोठ्या लोकसंख्येच्या गावात या कंत्राटी आरोग्य सेविकानी काम करून मोठे योगदान दिले आहे. तालुक्यातील २४ कंत्राटी आरोग्य सेविकांनी गेल्या दोन महिन्यात कानाकोपऱ्यातील वाडी वस्तीवरील घरोघरी जाऊन ६ हजार ९२० व्यक्तींना बीसीजी पेंटा, ट्रिपल पोलिओ, गोवर रूबेला, डांग्या खोकला, घटसर्प ,पोलिओ बूस्टर, एमएमआर बूस्टर अशा विविध प्रकारचे लसीकरण केले.