चारा छावण्या व पाण्याचे टॅंकर सुरू ठेवण्याचे महादेव जानकर यांचे आश्वासन
गोंदवले – माण तालुक्यात पुरेसा पाऊस पडून चारा उपलब्ध होत नाही तो पर्यत जनावरांच्या चारा छावण्या व पाण्याचे टॅंकर सुरू राहतील असे ठोस आश्वासन दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी दिले.
दहिवडी येथे पशुवैद्यकीय दवाखान्याच्या संरक्षण भिंतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रासपचे जिल्हा अध्यक्ष मामूशेठ विरकर सौ. वैशालीताई विरकर, जेष्ठ नेते बबनशेठ विरकर, आप्पा पुकळे, तहसीलदार बाई माने, गटविकास आधिकारी गोरख शेलार, पशुवैद्यकीय विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. माधव आठवले, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे, पशुधन विकास अधिकारी विस्तार डॉ. आरिफ इनामदार, पशुवैद्यकीय दवाखाना दहिवडी डॉ. मदने, डॉ. पाटील, डॉ. खाडे, डॉ. जाधव, डॉ. भांगे, डॉ. माने,डॉ. आटोळे, डॉ. स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
जानकर पुढे म्हणाले, शासनाने पहिल्यांदाच कायदा केला व शेळ्या मेंढ्याच्या छावण्या उभ्या केल्या. शेतकऱ्यांसाठी 35 कोटीचे मोफत बीयाणे वाटप केले. सातारा जिल्ह्यात सर्वाधीक पशुधन असणारा माण तालुका आहे. तालुक्याचे ठिकाण आसलेल्या दहिवडीमध्ये पशुविज्ञान केंद्र व आधुनिक विश्रामगृह करणार असून तातडीने प्रस्ताव करण्याच्या सूचना केल्या. रिक्त असलेली पदे आठवडाभरात भरणार असून त्यानंतर कोणाचीही अडचण रहाणार नाही. प्रत्येक तालुक्याला दोन तीन ऍम्ब्यु लन्स देण्याचा शासनाचा विचार असून जनावरांना तातडीने उपचार करणे सुलभ होईल.