जनावरांच्या शेडची भिंत वडगाव हवेलीत कोसळली
वडगाव हवेली – वडगावसह परीसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पडझडीचे प्रकार होत आहेत. येथील पोपट दशरथ साळुंखे यांच्या जनावराच्या शेडची भिंत कोसळल्याने जनावरे जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे. सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे घराच्या पडझडीचे प्रकार वाढले आहेत. वडगाव हवेली येथील पोपट साळुंखे यांच्या जनावरांच्या शेडची दगड विटा मातीची भिंत अचानक कोसळल्याने गोठ्यातील म्हैस, गाय व रेडकु मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले होते.
मोठा आवाज आल्याने शेजारी राहणाऱ्या प्रल्हाद जगताप, संपत जगताप, रावसाहेब जगताप यांनी गोठ्याकडे धाव घूेन जनावरांना मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. दगड विटासह भिंत अंगावरती पडल्याने गाय व म्हैस जखमी झाले. तर रेडकाचे चारही पाय मोडल्याने रेडकू गंभीर जखमी झाले आहे.
वडगाव हवेली – कराड तालुक्यातील दुशेरेसह परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे दुशेरे गावास पाण्याने पूर्णपणे वेढा घातला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस व कोयना धरणांमधून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे गावाला चारी बाजूने पूर्णपणे पाण्याने वेढा घातला आहे. तसेच गावच्या पुलावरही सायंकाळी सहाच्या दरम्यान पाणी आल्यामुळे दुशेरे गावचा संपर्क तुटला आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराच्या पाण्यामुळे येथील नदीकाठावरील काही कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.