Anil Masih: चंदीगडमध्ये झालेली महापौर निवडणुक वादात सापडली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांना चंदीगड महापौर निवडणुकीत विजयी घोषित केले आहे.
चंदीगडमध्ये महापौर पदासाठी 30 जानेवारीला मतदान झाले होते.
त्यात भाजपचे मनोज सोनकर यांना 16 मते मिळाली. आम आदमी पार्टी आणि काँग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप कुमार यांना 12 मते मिळाली. निवडणूक अधिकारी अनिल मसिह यांनी आठ मते बेकायदेशीर ठरवली. त्यानंतर भाजपचा महापौर करण्यात आला.
याप्रकरणी काँग्रेस आणि आपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान अनिल मसिह यांना खडेबोल सुनावले. चंदीगड महापौर निवडणुकीदरम्यान जे काही घडले ते लोकशाहीची हत्या आणि थट्टा असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. या संपूर्ण घटनेदरम्यान अनिल मसिह चर्चेत राहिले.
कोण आहे अनिल मसिह?
अनिल मसिह यांनी सरकारी शाळेतून शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी चंदीगड येथील सेक्टर 10 येथील डीएव्ही कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्यांची पत्नी पंजाब इंजिनिअरिंग हॉस्टेलच्या मुलींच्या वसतिगृहाची व्यवस्थापक आहे. काही वर्षांपूर्वी अनिल मसिह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
53 वर्षीय अनिल मसिह हे भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीशी संबंधित आहेत. 2021 च्या चंदीगड महापालिका निवडणुकीत भाजपकडून त्यांना तिकीट मिळू शकले नव्हते. त्यानंतर भाजपने मसीह यांची अल्पसंख्याक मोर्चाच्या महासचिवपदी नियुक्ती केली होती. मात्र, महापौर निवडणुकीनंतर वादात सापडल्याने भाजपने मसिह यांना पदावरून हटवले.
यापूर्वीही वादात सापडले
अनिल मसिह यांचे नाव यापूर्वीही वादात सापडले आहे. 2018 मध्ये चर्चमध्ये अपशब्द वापरल्यानंतर त्याच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. चर्च ऑफ नॉर्थ इंडियाच्या (सीएनआय) समितीच्या बैठकीत मसिह यांनी अपशब्द वापरले होते. यानंतर त्यांना चर्चच्या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास बंदी घालण्यात आली. मात्र, दोन वर्षांनंतर सीएनआय बिशप डेन्झेल पीपल्सने त्यांच्यावरील बंदी उठवली.
महापौर निवडणुकीत काय झाले?
चंदीगड महापालिकेत एकूण 35 नगरसेवक आणि खासदार किरण खेर यांचेही मत आहे. अशा प्रकारे एकूण 36 मते होती. महापौरपदाची निवडणूक जिंकण्यासाठी 19 मतांची गरज होती. भाजपकडे 14 नगरसेवक, एक खासदार आणि अकाली दलाच्या एका नगरसेवकानेही भाजपला पाठिंबा दिला. अशी एकूण 15 मते होती. तर आम आदमी पक्षाकडे 13 तर काँग्रेसकडे 7 नगरसेवक आहेत.
आम आदमी पार्टी आणि काँग्रेसने मिळून कुलदीप कुमार यांना उमेदवारी दिली. तर, मनोज सोनकर हे भाजपचे होते. कुलदीप कुमार यांना 20 तर मनोज सोनकर यांना 16 मते मिळाली. मात्र अनिल मसिह यांनी कुलदीप कुमार यांना मिळालेल्या 20 पैकी 8 मते अवैध ठरवली. अशाप्रकारे कुलदीप कुमार यांना 12 तर मनोज सोनकर यांना 16 मते मिळाली. मात्र याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिल्यानंतर आम आदमी पक्षाचे उमेदवार कुलदीप कुमार यांंना विजयी घोषित करण्यात आले.