मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने काल धडक कारवाई केली आहे. ईडीच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी सकाळपासून मुंबई, नागपूरमधील देशमुख यांच्या निवास्थानासह तब्बल पाच ठिकाणी छापेमारी करत काही महत्त्वाचे दस्तावेज ताब्यात घेतले. तसेच मध्यरात्री देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना अटक केली आहे.
१०० कोटींच्या वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. देशमुखांवर लाच घेतल्याचे आरोप झाले असून त्या प्रकरणात झालेली ही पहिली अटक आहे.
स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना पीएमएलए कायद्याअंतर्गत दोघांवर कारवाई झाली. शुक्रवारी रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली होती. आज सकाळी ११ वाजता दोघांनाही पीएमएलए कोर्टात हजर केले जाणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे.
संबंधित बातम्या –
▶ईडीकडून 395 कोटींची प्रॉपर्टी जप्त
▶ काही दिवसांनी वसूली मिनिस्टर अनिल देशमुखांची तुरूंगात रवानगी होणार – किरीट सोमय्या
▶देशमुखांच्या घरी ‘ईडी’च्या छापेमारीवर गृहमंत्र्यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
▶ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा; अडचणीत होणार वाढ?