Andheri Bypolls 2022 – अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण राज्यभराचे लक्ष लागून राहिले आहे. एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी केलेल्या बंडानंतर राज्यात प्रथमच मोठी निवडणूक होत आहे. ही विधानसभा निवडणूक जरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ऋतुजा लटके Rituja Latke विरुद्ध भाजप उमेदवार व एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाचा पाठिंबा असलेले मुरजी पटेल Murji Patel यांच्यात होत असली तरी या निवडणुकीतून खरी परीक्षा उद्धव ठाकरे Uddhav Thackeray व एकनाथ शिंदे यांचीच होणार आहे.
ऋतुजा लटके रमेश लटकेंचा विजयाचा कित्ता गिरवणार की मुरजी पटेल बाजी मारणार?
2014 विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना व भाजप स्वबळावर लढले होते. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर रमेश लटके तर भाजपच्या कमळ चिन्हावर ललनप्रसाद यादव यांनी निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीमध्ये रमेश लटके यांनी यादव यांचा पराभव केलेला. लटके यांना सर्वाधिक 52817 मतं पडली होती तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या यादव यांना 47338 मतं मिळाली होती. विशेष म्हणजे, 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये देशात मोदी लाट असताना लागलीच झालेल्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये लटकेंनी हे यश मिळवलेलं.
2019 विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र शिवसेना भाजप यांनी निवडणूकपूर्व युती केली. अंधेरी पूर्वची जागा विद्यमान आमदार असल्याने लटके यांच्या वाट्याला आली.
या निवडणुकीमध्ये लटके यांच्याविरोधात मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली. शिवसेना भाजप युतीचे उमेदवार म्हणून लढलेल्या लटके यांनी २०१४ पेक्षा चांगली कामगिरी करत विजयी 62773 मतं मिळवली तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मुरजी पटेल यांना 45808 मतं मिळाली.
अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंची सावध भूमिका; दोन उमेदवारांचे भरले अर्ज, पाहा दुसरा उमेदवार कोण?
लटके यांच्या मृत्यूनंतर आता ही जागा रिकामी झाली असून पोटनिवडणुकीतून मुरजी पटेल पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. पटेल यांच्या पाठीशी यंदा भाजपचे चिन्ह व एकनाथ शिंदे गटाचा पाठिंबा आहे. तर दुसरीकडे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांच्याकडे उद्धव ठाकरे गटासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा पाठिंबा आहे. त्यामुळे ऋतुजा लटके भाजप उमेदवार पटेल यांना पराभूत करून २०१४ मध्ये रमेश लटकेंनी भाजप उमेदवाराविरोधात मिळवलेल्या विजयाचा कित्ता गिरवणार की मुरजी पटेल बाजी मारणार? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.
खरे शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडेच?
एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाला शिवसेनेच्या बहुतांश आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला होता. असं असलं तरी खुद्द उद्धव ठाकरे व त्यांचं नेतृत्व मानणाऱ्या नेत्यांनी आमदार, खासदार गेले तरी शिवसैनिक मात्र ठाकरे व मातोश्रीसोबतच असल्याचा दावा वारंवार केला आहे. अंधेरी पूर्व ही विधानसभेची जागा 2014 पासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या या जागेवर येत्या 3 नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके असून त्या दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आहेत.
गेल्या १० वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात राहिलेल्या या मतदारसंघात शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभे राहतात का? यांच्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
एकनाथ शिंदे गटाचा पाठिंबा भाजप उमेदवाराला फायद्याचा की तोट्याचा?
एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना गटाने या निवडणुकीत भाजप उमेदवार मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला आहे. पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिंदे गटाचे महत्वाचे नेते दीपक केसरकर स्वतः उपस्थित होते. यामुळे शिंदे गट प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरला नसला तरी शिंदे गट आपली सर्व ताकद भाजप उमेदवाराच्या मागे उभी करणार असल्याचं अधोरेखित होत.
या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवाराचा पराभव करून सामान्य शिवसैनिक देखील आपल्यासोबत असल्याचं ‘नॅरेटिव्ह’ कायम करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न असेल. मात्र ज्याप्रकारे उद्धव ठाकरे यांच्यामागे सहानुभूतीची लाट असल्याचं बोललं जातंय त्याचं रूपांतर मतांमध्ये झाल्यास शिंदे गटाचा पाठिंबा पटेल यांच्यासाठीच तोट्याचा ठरू शकतो अशीही चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंना काँग्रेस फॅक्टरचा फायदा?
२०१४ मध्ये झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा निव्वडणणुकांमध्ये रमेश लटकेचा विजय झालेला तर भाजपचे ललनप्रसाद यादव दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले. या यादीत तिसरं नाव होत काँग्रेस उमेदवार अमीन जगदीश कुट्टी यांचं. कुट्टी यांना 27951 मतं मिळाली होती. २०१४ पूर्वी अंधेरी पूर्वमध्ये काँग्रेसचाच वरचष्मा होता. २००९ मध्ये अंधेरी पूर्व विधानसभेचे नेतृत्व काँग्रेस आमदार शेट्टी सुरेश हिरियाण्णा यांनी केलं होत. यन्नडा मात्र काँग्रेसने अंधेरीमध्ये उमेदवार दिला नसून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. यामुळे उद्धव ठाकरेंना काँग्रेसचा फायदा होणार का? याचाही निकाल या निवडणुकीतून लागणार आहे.