…अन्‌ तिथेच चुकचुकली शंकेची पाल

प्रशांत जाधव
सातारा  – बोधेवाडी (ता. कोरेगाव) येथील घाटात झालेला खून एखाद्या थरारक चित्रपटालाही लाजवेल असा घडला. विमा योजनेचे दीड कोटी रुपये मिळवण्यासाठी एकाने नातेवाईंकांच्या मदतीने स्वतःच्या खुनाचा कट आखला. एवढेच नव्हे तर एका निष्पाप टेलरचा खूनही केला. मात्र, पोलिसांनीही “सिंघम’मधल्या बाजीरावला आणि “सीआयडी’ मालिकेतील एसीपी प्रद्युम्नला लाजवेल, असा अतंत्य कौशल्यपूर्ण तपास करुन या खुनाचे गूढ उलगडले. सुमितच्या खुनाची बातमी त्याच्या नातेवाईकांना पोलिसांनी कळवल्यानंतर त्यांच्या वागण्यातील कोरडेपणा पोलिसांच्या नजरेत भरला आणि तिथेच शंकेची पाल चुकचुकल्याने संशियताच्या हातात आता विम्याचे पैसे नव्हे तर बेड्या पडल्या आहेत.

बोधेवाडीच्या घाटात दि. 21 रोजी एक मृतदेह व त्याची गाडी जळत असल्याची माहिती देण्यासाठी वाठार स्टेशन पोलीसांचा फोन खणाणला. घटनेचे गांभीर्य ओळखत पोलीस दलातील अनेक बडे अधिकारी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह जळाल्याने त्याची ओळख पटवण्यात अडचणी आल्या. जळालेल्या गाडीवरून पोलिसांनी गाडी मालकाचा शोध लावला. गाडी मालक जितेंद्र श्रीरंग कांबळे (रा. महिमानगड, ता. माण) याच्या दारात पोलिसांच्या गाड्या धडकल्या. कांबळे याला घटनास्थळी आणल्यानंतर मृत हा त्याचा भाचा सुमित असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर जळालेला मृतदेह सुमितचा आहे, असे गृहीत धरून पोलीस तपास करू लागले. दरम्यान, घटनास्थळी सुमितचा भाऊ व इतर नातेवाईक दाखल झाले.

त्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यापासून ते अंत्यसंस्कार करण्यापर्यंत दाखवलेली अनास्था आणि त्यांच्या डोळ्यातून येणारे कोरडे अश्रू पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने टिपले. आणि तपासाची दिशा बदलण्याचा निर्णय पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड व त्यांच्या टीमने घेतला. पोलिसांनी प्रथम सुमितचा भाऊ तपासाचा केंद्रबिंदू केला आणि खऱ्या अर्थाने या खूनाचे गुढ उकलण्यास सुरूवात झाली. सुमितच्या भावाला पोलिसांनी त्यांच्या प्रेमळ स्टाईलमध्ये व लोकांच्या भाषेतील रिमांडमध्ये घेतले. त्यावर त्याने सांगितलेली स्टोरी ऐकल्यानंतर पोलीसही काळ चक्रावले होते. सुमितने काही दिवसांपुर्वी मुंबईत प्रोटीन विक्रीचा व्यसवसाय सुरू केला होता. त्यामध्ये त्याला अपयश आल्याने लोकांचे कर्ज फेडण्यासाठी मोरे कुटुंबांने भन्नाट आयडिया अंमलात आणायचे ठरविले.

सुमितच्या नावाने “आयसीआयसीआय”चा दीड कोटींचा विमा उतरवला होता. त्या विम्याचे पैसे आले की, लोकांची देणी द्यायची अन्‌ बाकी रकमेतून दुसरा काहीतरी व्यवसाय करण्याचे त्यांनी योजिले होते. त्यासाठीच हा सगळा खेळ मांडल्याचे सांगतानाच सुमितला मृत दाखवण्यासाठी त्याच गावातील तानाजी बाबा आवळे या टेलर व्यवसाय करणाऱ्या युवकाचा खून केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी सुमित कुठे आहे, याबाबत विचारणा केल्यावर त्याने तो जेजुरी (जि. पुणे) येथे लपून बसल्याची माहिती दिली. पोलिसांनी जेजूरीतून सुमितच्या मुसक्‍या आवळल्या. एखाद्या चित्रपटाला साजेल, अशी ही खुनाची कहाणी रचणाऱ्या सुमित व त्याच्या नातेवाईकांना कदाचित कल्पना नसावी की, पोलीसदेखील चित्रपटातील कहाणीसारखाच तपास करू शकतात.

आईच्या आक्रोशाने पोलिसही गहिवरले
बोधेवाडी घाटातील मृत सुमित नसून तानाजी आवळे असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्या आई- वडीलांना पुसेगाव पोलीस ठाण्यात बोलवले होते. पोलिसांनी नेमके कशासाठी बोलवले, याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना बसवून बोधेवाडी घाटातील मृत सुमित नसून तुमचा मुलगा तानाजी असल्याचे सांगताच, तानाजीच्या आई वडिलांनी केलेल्या आक्रोशामुळे पुसेगाव पोलीस ठाण्यात उपस्थित पोलीसही गहिवरले होते.

गरूड म्हणाले, “स्वप्नील, कुछ तो गडबड है’
सुमितच्या खुनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना पुसेगाव पोलीस ठाण्यात बोलवले होते. त्यावेळी नातेवाईकांच्या विविध भूमिका, मृतदेह ताब्यात घेताना व अंत्यसंस्कार करण्यासाठी दाखवलेली अनास्था कोरेगावचे पोलीस उपअधीक्षक सुहास गरुड यांच्या नजरेत बसली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वाठार-स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे यांना उद्देशून “स्वप्नील, कुछ तो गडबड है,’ असे सांगत तपासाची दिशा बदलली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here