राजगुरूनगर -राजगुरूनगर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयात आयोजित वकील महिलांच्या हळदी-कुंकू व रांगोळी स्पर्धा कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला.
राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात काम करणाऱ्या वकील महिला आणि न्यायालयीन महिला कर्मचारी यांनी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे न्यायालयात आयोजन केले होते. यानिमित्ताने महिला वकिलांची रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. रांगोळीमधून महिलांचे अनेक प्रश्न मांडण्यात आले.
अर्चना किर्लोस्कर, सुचेता खांडगे, मनीषा टाकळकर, मनीषा वाघ, आरती सैद, दीपाली दळवी, हर्षा पांडे, स्नेहल पवळे, वंदना धुमाळ, आरती टाकळकर, भाग्यश्री शिंदे आदी वकील भगिनींनी रांगोळीतून चित्र साकारली. त्यानंतर हळदी-कुंकू समारंभ झाला. यात न्यायालयातील महिला वकील, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
महिलांनी आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धा व रांगोळीतून संदेश देणाऱ्या कलाकृतीचे न्यायालयातील न्यायाधीश आणि वकील बार असोशिएशनच्या वतीने कौतुक करण्यात आले. वकील महिलांनी काढलेल्या रांगोळीचे परीक्षण न्यायाधीश एन. के. बह्मे यांनी केले.
रविवारी (दि. 26) रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत. दरम्यान या रांगोळी स्पर्धेला पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन. पी. धोटे यांनी भेट दिली, तर हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांना झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले.
ऍड. मनीषा टाकळकर यांनी यावेळी सांगितले की, येथील न्यायालयात प्रथमच हा उपक्रम घेण्यात आला आहे. महिला वकील सदस्यांनी रांगोळी स्पर्धेसाठी चांगला प्रतिसाद दिला. रांगोळीतून त्यांनी महिलांचे प्रश्न मांडले. आगामी काळात न्यायालयातील वकिलांच्या विविध स्पर्धा घेण्याचे नियोजन आहे. रांगोळी स्पर्धेत भाग घेतलेल्या महिलांचा रविवारी गौरव करण्यात येणार आहे.