बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने सध्या करोना व्हायरसमुळे स्वत:ला सेल्फ क्वारंटीन करून ठेवले आहे. मात्र, कॅट तिच्या चाहत्यांचे सोशल मीडियावर नव-नवीन फोटो आणि व्हिडिओंद्वारे मनोरंजन करीत आहे.
भांडे धुवत असतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता कतरिनाने अलीकडेच आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती झाडूने क्रिकेट खेळताना दिसत आहे. कतरिनाने तिच्या इंस्टाग्राम हॅंडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती झाडूने फरशी साफ करताना दिसत आहे. हा व्हिडिओ तिची बहीण इसाबेल कैफने शूटिंग केला आहे.
या व्हिडिओत प्रथम कतरिना घरात झाडू मारताना दिसते. यानंतर ती थेट झाडू घेवून फलंदाजी करत क्रिकेट कसे खेळता येईल याविषयी चाहत्यांना सांगते. यात ती खूपच खूश असल्याचे दिसत आहे. तिने सांगितले की, हा क्वारंटीनचा 21वा दिवस आहे.
दरम्यान, वर्क फ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास कतरिना लवकरच दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या “सूर्यवंशी’ चित्रपटात झळकणार आहे. यात तिच्यासोबत अक्षय कुमार मुख्य नायकाची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 21मार्च रोजी प्रदर्शित होणार होता. पण भारतासह जगभरात पसरलेल्या करोना विषाणूमुळे तो पुढे ढकलण्यात आला आहे.