लॉकडाऊनचा फटका : समर्थ पोलिसांनी तासाभरात घेतले ताब्यात
पुणे – लॉकडाऊनमुळे पैसे कमावण्यात अपयशी ठरल्यामुळे एका रिअल इस्टेट एजंटने सोनसाखळी चोरी केली. मात्र, समर्थ पोलिसांनी तासाभरात त्याला जेरबंद केले. त्याने ज्येष्ठ महिलेची 35 हजार रुपयांची सोनसाखळी चोरली होती.
मोहम्मद आतिफ इक्बाल शेख (वय 26, रा. नाना पेठ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी ज्येष्ठ महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, एका स्कुटरस्वाराने तिची चेन हिसकावली आणि तो पसार झाला होता. यासंदर्भात माहिती देताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कपुरे यांनी सांगितले की, सोनसाखळी हिसकावण्यासाठी संबंधिताने हिरव्या रंगाची स्कुटर वापरल्याची माहिती महिलेने दिली होती. यामुळे आम्ही त्या परिसरातील स्कुटर्स आणि दागिन्यांच्या दुकानांत तपासणी करण्याचे ठरविले. त्याचवेळी परिसरातील फोनकॉल्सच्या तपशिलांचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. यामध्ये शेखचा नंबर शोधण्यात यश आले.
हिरव्या रंगाच्या स्कुटरचा चालक नानापेठेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दागिन्यांच्या दोन दुकानांजवळ सापळा रचण्यात आला. यानंतर शेख याला हवालदार साहिल शेख, संतोष काळे, नीलेश साबळे, प्रमोद टिळेकर, सुमित कुट्टे आणि स्वप्नील वाघोले यांच्या पथकाने अटक केली त्यावेळी महिलने तिची सोनसाखळी ओळखली.
शेखचे कुटुंबीय हादरले
शेख हा रिअल इस्टेट एजंट आहे. नाना पेठ आणि कॅम्प परिसरात तो व्यवसाय करतो. लॉकडाऊन काळात त्याचा व्यवसाय कमी झाला होता. विवाहित असलेल्या शेख याला कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे उत्पन्न मिळाले नाही. यामुळे त्याने ज्येष्ठ महिलेला हेरुन सोनसाखळी हिसकावण्याचा निर्णय घेतला. उदरनिर्वाहासाठी पैसे नसल्याने आतिफ अस्वस्थ होता. तो पहाटे लवकर उठून सतत विचार करत होता, अशी माहिती त्यांच्या पत्नीने पोलिसांना दिली. त्याने चोरी केल्याने त्याच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.