मंचर – मागील साडेतीन महिन्यापासून करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना पिंपळगाव ग्रामपंचायतीने योग्य ती खबरदारी घेतल्यामुळे गावातील कोणालाही करोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. सरपंच, उपसरपंच, सदस्य, तसेच आंबेगाव तालुका प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या योग्य नियोजन असल्यामुळे सद्यःस्थितीत तरी पिंपळगाव करोनामुक्त आहे.
व्यवसाय आणि नोकरीनिमित्त पुणे, मुंबई आणि इतर शहरांत असलेले एक हजारापेक्षा अधिक नागरिक पिंपळगाव येथे मूळ गावी आले आहेत. गावाने आणि बाहेरून आलेल्या नागरिकांनी प्रशासनाच्या नियमांचे योग्य काटेकोर पालन केल्याने गावामध्ये एकही करोनाचा रुग्ण आढळून आला नाही.
सर्वच नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्याने करोना दूर ठेवण्यास यश आले आहे. गावात विनाकारण फिरताना आढळला तर त्याच्यावर पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे सांगितल्याने सर्वांनी नियम पाळल्याने गावापासून करोना दूर राहिला आहे.