पुणे – राज्यातील शिधापत्रिकाधारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त 100 रुपयांमध्ये चार जिन्नसांचा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे-पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका, अशा एकूण 8 लाख 84 हजार शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. येत्या शुक्रवारपासून (दि. 1 सप्टेंबर) आनंदाचा शिधा वाटप करण्यास सुरुवात होणार आहे.
शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर मागील वर्षी दिवाळीमध्ये तसेच गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आनंदाचा शिधाचे वितरण केले आहे. आता शासनाने गौरी-गणपती सणानिमित्त आनंदाचा शिधाचे वितरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हानिहाय लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 3 लाख 20 हजार 443 शिधापत्रिकाधारक आणि ग्रामीण भागातील 5 लाख 62 हजार 795 शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप केले जाणार आहे. ई-पॉसद्धारे आनंदाचा शिधा याचे वितरण रेशन दुकानांमधून केले जाईल.
दि.1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत याचे वितरण केले जाणार आहे. याबाबतच्या सूचना शासनाने जारी केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने शिधा किटमध्ये समाविष्ट असलेल्या पदार्थ्यांचे अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या मानकाची पूर्तता करीत असल्याचे एनएबीएल अधिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र पुरवठादाराकडून यायला हवे. किटमधील वस्तुंची खराब न होण्याची अर्थात एक्सपायरी तारीख ही चार महिन्यांची असल्याचे खात्री करून हे किट स्वीकारावे, अशा सूचना अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अवर सचिव पूजा मानकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
या वस्तूंचा समावेश
अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाच आनंदाचा शिधा दिला जाणार आहे. शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयात 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर तसेच 1 लीटर खाद्यतेल मिळणार आहे.