वडगाव मावळ, (वार्ताहर) – शासनाने नागरिकांना रेशन कार्ड मिळविण्यासाठी किंवा त्यातील दुरुस्तीसाठी शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये यासाठी शासनाने रेशन कार्ड बाबतची सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिलेली आहे. पण सदरची प्रक्रिया अवघड व किचकट असल्याने सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्ड अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे जमत नाही. याचा गैरफायदा नागरिक सुविधा केंद्र चालक घेत आहेत.
रेशन कार्ड काढून देण्यासाठी नागरी सुविधा केंद्र चालक नागरिकांची लूट करत आहेत. नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी तीन ते पाच हजार रुपये घेतले जात आहेत. तसेच नाव वाढविण्यासाठी सातशे ते एक हजार रुपये घेतले जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरिकांना सुविधा केंद्रामध्ये जाण्यासाठी सांगितले जात आहे.
यामुळे नक्की ऑनलाइन रेशन कार्ड सुविधा कोणासाठी सुरू केली असे प्रश्न नागरिक विचारत आहे. या यंत्रेणेवर कोणाचाही अंकुश नाही. नवीन रेशन कार्ड किंवा दुरुस्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यास कोणत्याही प्रकारचे शुल्क शासनाकडून आकारण्यात आलेली नाही.
जर नागरिकांनी जर स्वतः ऑनलाईन पद्धतीने रेशनकार्ड मिळविण्यासाठी अर्ज केल्यास तालुका पुरवठा विभागातील अधिकारी त्यास लवकर मंजुरी देत नाहीत. मात्र नागरीसुविधा केंद्र चालकांनी केलेल्या अर्जांना तत्काळ मंजुरी मिळते. नागरिकांच्य तक्रारीनंतर कार्यालयातील कर्मचारी नागरीकांशी उद्धट बोलतात.
तालुका पुरवठा कार्यालयावर नागरीसुविधा केंद्र चालकांनी ताबा घेतला असून येथील कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत त्यांचे खुर्चीत बसून कामकाज करताना आढळून येत आहेत. शासनाने पुरवठा विभागाच्या ऑनलाईन पद्धतीमुळे नागरीकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो आहे. तर नागरी सुविधा केंद्र चालकांना मोठा आर्थिक फायदा होताना दिसत आहे.