पिंपरी – आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका या महायुतीबरोबर लढणार असून तर महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर नेत्यांनी निर्णय घ्यावा, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि.25) राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात केली. त्यामुळे शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजप आणि शिवसेनेमधील इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
राज्यात (दि.2) जुलैला राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उभी फूट पडून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री पवार असे दोन गट पडले आहेत. शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख पदाधिकारी अजित पवार यांच्या सोबत गेले आहेत. पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शुक्रवारी पक्षाच्या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच शहरात आले होते. यावेळी शहर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मोठ्या धूमधडाक्यात स्वागत करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेत नगरसेवक संख्या 128 आहे. शहरात भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) यांची समान राजकीय ताकद आहे. दोन्ही पक्षांकडे 128 जागेवर चांगले तगडे उमेदवारही आहेत. तर शिवसेनेची या दोन्ही पक्षाच्या तुलनेत कमी ताकद आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुकीसाठी तिन्ही पक्षांच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. असे असताना तिन्ही पक्ष एकत्र लढले तर आपल्याला तिकीट मिळेल का? आपल्या राजकीय भवितव्याचे काय होणार? याची भीती इच्छुकांना सतावत होती. तसेच तिन्ही पक्षात बंडखोरी होण्याचीही शक्यता असून कार्यकर्त्यांना जर निवडणुकीसाठी तिकीटच देता येणार नसेल तर पक्षाचे ते काम करतील का? हाही महत्वाचा प्रश्न होता.
महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची सलगपणे 15 वर्षांची असलेली सत्ता 2017 च्या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी काबीज करत भाजपची एकहाती सत्ता आणली होती. भाजपचे 77 तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांनी व्यूहरचनाही आखण्यास सुरूवात केली होती. भाजपनेही महापालिकेत दुसऱ्यांदा एकहात्ती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. भाजप आणि राष्ट्रवादीने पालिकेत शंभर नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार केला होता. या निर्धाराला राज्यातील बदलेल्या सत्ता समीकरणांमुळे खीळ बसते की काय? अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका या महायुतीबरोबर लढणार असून तर महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवर नेत्यांनी निर्णय घ्यावा. स्थानिक नेत्यांना वाटले की आपण स्वबळावर निवडणूका लढायच्या किंवा युतीत लढायचा हा सर्व तुमचा निर्णय असेल, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील इच्छुकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. पालिका निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) आमने सामने राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शहरात राष्ट्रवादीपेक्षा भाजप सरस
चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपच्या अश्विनी जगताप आणि भोसरी मतदार संघात महेश लांडगे आमदार आहेत. विधान परिषदेच्या उमा खापरे असे तीन आमदार भाजपचे आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी विधानसभा मतदार संघावर वर्चस्व असून अण्णा बनसोडे आमदार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला शहरात राष्ट्रवादीपेक्षा भाजप सरस असल्याचे दिसून येत आहे.
2017 मधील पालिकेतील पक्षीय बलाबल
भाजप -77
राष्ट्रवादी-36
शिवसेना-9
अपक्ष-5
मनसे-1