भोर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे : तहसीलदारांना निवेदन
मागण्या मान्य होई पर्यंत आंदोलन सुरू राहणार
भोर – रेशन धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी भोर तालुका स्वत धान्य व केरोसिन दुकानदार संघ यांच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. विविध मागण्यासाठी रेशनिग दुकानदार संघाच्या वतीने तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ वचकल, उपाध्यक्ष मनोज खोपडे, राजेंद्र बांदल, जगन्नाथ गोळे, मिलीद आवाळे, कुमार साळुंके, शेखर पिसाळ, अतुल कोंडे, अब्दुल शेख, शंकर खोपडे यांसह रेशन दुकानदार उपस्थित होते. या दुकानदारांच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत- १२ वर्षांपासून रेशन धान्य दुकानदारांना देण्यात येत असलेल्या तुटपुंज्या कमिशनमध्ये आत्ताच्या महागाईप्रमाणे वाढ करण्यात येऊन ते किमान ३०० रुपये प्रतीक्विंटल दिले जावे.
सात वर्षापासून दिलेल्या पॉस मशीन कालबाह्य झालेल्या असून नवीन ४-जी प्रणालीच्या मशीन देण्यात याव्यात. रेशन धान्य दुकानदारांना दिले जाणारे गोडाऊन हे पूर्णपणे प्रमाणित करून दिले जावे. येणाऱ्या गाडीबरोबर धान्याचे परमिट व वाहतूक ठेकेदाराची पोहोच प्रत दिली जावी, तसेच धान्य पोहोच करण्याची पूर्वकल्पना किमान एक दिवस अगोदर रेशन दुकानदारास दिली जावी. रेशन दुकानांमध्ये धान्य हे सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेतच पाठवले जावे.
नवीन रेशन दुकान परवाने मंजूर करताना सध्या असलेल्या दुकानाची कार्ड संख्या, लोकसंख्या यांचा विचार केला जावा, केवळ नियम म्हणून न परवडणारी दुकाने नव्याने दिली जाऊ नयेत. पाचशे कार्ड संख्या अथवा दोन हजार लोकसंख्येपेक्षा कमी असणाऱ्या लाभार्थी संख्येसाठी दुकान दिले जाऊ नये. मागील अनेक वर्षापासून बंद करण्यात आलेली केरोसिन दुकाने पूर्ववत चालू करून आत्ताच्या महागाईच्या काळात दैनंदिन विविध कारणांसाठी लागणारा केरोसिन पुरवठा सर्वसाधारण कार्डधारकांसाठी चालू करण्यात यावा.
रेशनिंग दुकानदारांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून, अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जोपर्यंत योग्य न्याय मिळत नाही तोपर्यंत बेमुदत संप करण्यात येणार आहे.
सोमनाथ वचकल, जिल्हा अध्यक्ष, धान्य व केरोसिन दुकानदार संघ