शिक्रापूर (प्रतिनिधी) : शिक्रापूर (ता. शिरूर) सह परिसरात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना तसेच काही कोरोना बाधितांचा मृत्यू होत असताना आता दोन दिवसात शिक्रापूर सह परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी तब्बल अठ्ठेचाळीस कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. शिक्रापुरात एका कोरोना बाधित कंपनी कामगाराच्या घरातील चौघांना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी व तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली आहे.
शिक्रापूर (ता. शिरूर) सह परिसरात असलेल्या सणसवाडी, तळेगाव ढमढेरे, कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, कोंढापुरी यांसह आदी गावांमध्ये दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना काही कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असताना आता वीस ऑगस्ट व एकवीस ऑगस्ट या दोन दिवसात शिक्रापूर येथे बावीस, तळेगाव ढमढेरे येथे पाच, सणसवाडी येथे सात, विठ्ठलवाडी येथे एक, कोरेगाव भीमा येथे सहा, निमगाव म्हाळुंगी येथे दोन, कोंढापुरी येथे एक, टाकळी भीमा येथे दोन, धानोरे येथे दोन अशा एकूण अठ्ठेचाळीस जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
तर आज कोरोना बाधित म्हणून समोर आलेल्या व्यक्तींपैकी शिक्रापूर येथील येथील एका कोरोना बाधित कंपनी कामगाराच्या घरातील चार जणांचा समावेश असून कोरोना बाधितांमध्ये जास्त कंपनी कामगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. दररोज कोरोना बाधितांच्या संख्येत आणि मृत्यूत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिसरातील कोरोना बाधित नवीन रुग्णांची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागाचे आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे व आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, आरोग्य सेविका जनाबाई शिरसाठ, शोभा ढमढेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर रुग्ण राहत असलेल्या परिसरात ग्रामपंचायतच्या माध्यमातून औषध फवारणी करत परिसर निर्जंतुकीकरण केला आहे. आज नव्याने आढळून आलेल्या सर्व कोरोना बाधितांच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती घेण्याचे काम आरोग्य विभागाने सुरु केले आहे. मात्र नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेत नागरिकांनी व ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.