मंचर -आंबेगाव तालुक्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या मंगळवारी (दि. 14) एकाच दिवशी 18 ने वाढली असून, एकुण संख्या 114 झाली आहे. मंचर शहरात चार रुग्ण, महाळुंगे पडवळ येथे सात रुग्ण, पारगांव येथे पाच रुग्ण, टाव्हरेवाडी आणि घोडेगांव येथील प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी बुधवारी (दि. 15) दिली.
आंबेगाव तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 114 झाली असून, 57 रुग्ण बरे झाले आहेत, तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 54 रुग्णांवर उपचार चालू आहेत.बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन केले आहे. नागरिकांनी महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. बाहेर पडावेच लागले तर मास्कचा वापर करावा, अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिला आहे.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे म्हणाले की, ग्रामस्थांनी जागरूकता बाळगावी. करोनाबाधित रुग्ण आढळलेल्या गावांत बाहेर गावाहून येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. गावातील रस्ते आणि परिसराची फवारणी करून निर्जंतुकीकरण करून गावात स्वच्छता केली जाणार आहे, अशी माहिती महाळुंगे पडवळ, पारगांव,टाव्हरेवाडी, मंचर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने दिली आहे.