पुणे – करोना रुग्णांना बेडस् व वैद्यकीय सेवा वेळेत मिळवून देण्यासाठी सर्व खासगी रुग्णालयांनी उपलब्ध बेड व अन्य आवश्यक माहिती डॅशबोर्डवर अचूक व वेळेत नोंदवावी, असे आदेश विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी दिले आहेत. दरम्यान, दोन इमारती असणाऱ्या रुग्णालयांनी एक इमारत “कोविड हॉस्पिटल’ म्हणून घोषित करून त्यानुसार उपचार सुरू करावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
राव यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील प्रमुख रुग्णालयांचे व्यवस्थापक, संचालक व डॉक्टरांसोबत बैठक घेण्यात आली. यावेळी पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त पवनीत कौर, सहायक धर्मादाय आयुक्त नवनाथ जगताप, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, ससून हॉस्पिटलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे उपस्थित होते.
सौरभ राव म्हणाले…
– हॉस्पिटल्सनी रुग्णांकडून अवाजवी शुल्क आकारणी करू नये.
– रुग्णांच्या उपचारांत हलगर्जीपणा होता कामा नये.
– लक्षणे नसणाऱ्याचे समुपदेशन करून घरीच अलगीकरण करावे.
– करोनाची भीती कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.
5 उपजिल्ह्याधिकाऱ्यांची फौज
प्रशासन आणि रुग्णालय प्रशासनात समन्वय असणे आवश्यक आहे, यासाठी पाच उपजिल्हाधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे अधिकारी रुग्णालयांतील बेडस्ची उपलब्धता, आकारण्यात येणारे शुल्क शासकीय नियमांनुसार होत असल्याबाबत माहिती घेणे व अन्य वैद्यकीय सेवा सुविधांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करणार आहेत. यामुळे खासगी हॉस्पिटलवर वॉच राहणार आहे.
1,488 “एसपीओ’ करणार घरोघरी सर्वेक्षण
करोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मदतीसाठी नेमलेल्या विशेष पोलीस अधिकारी (एसपीओ) स्वयंसेवकांना आता घरोघरी सर्वेक्षणाचे काम देण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 1,488 जणांची सेवा महापालिका घेणार असून त्यांची प्रत्येकी 2 प्रमाणे सुमारे 743 पथके सर्वेक्षणाच्या कामात तैनात केली जाणार आहेत. महापालिकेच्या पाच परिमंडळांमध्ये हे नियुक्त करण्यात आले आहे.
करोना बाधितांना महात्मा फुले जन आरोग्य योजना व अन्य योजनांचा लाभ मिळवून द्यावा. या रुग्णांसाठी अधिकाधिक बेड तयार करावेत. अवाजवी शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल
– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी