मुंबई :- अमूल कंपनीच्या प्रसिद्ध अमूल जाहिरातील “अटरली-बटरली गर्ल’चे निर्माते सिल्वेस्टर डाकुन्हा यांचे बुधवारी निधन झाले. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अमूल इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ट्विट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
“अत्यंत दुःखाने सर्वांना सांगावेसे वाटते की, डाकुन्हा कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष सिल्वेस्टर डकुन्हा यांचे निधन झाले आहे. भारतीय जाहिरात उद्योगातील दिग्गज असलेले डाकुन्हा 1960 पासून अमूलशी संबंधित होते. या शोकात अमूल परिवार सहभागी झाला आहे,’ असे अमूल समूहाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
अमूलच्या यशामध्ये डाकुन्हा यांच्या जाहिरात मोहिमेचा मोठा वाटा आहे. निळ्या रंगाचे केस, पांढरा आणि लाल डॉट फ्रॉक घातलेली अमूल गर्ल तिची ब्रॅंड ओळख बनली आहे.
अमूल आपल्या जाहिरात मोहिमांमध्ये चालू घडामोडींशी संबंधित वन लाइनर बनवण्यासाठी लोकप्रिय आहे. अमूलची जाहिरात मोहीम 1966 मध्ये सुरू झाली. बॉम्बे ऍडव्हर्टायझिंग एजन्सी अँड सेल्स प्रमोशनला (एएसपी) अमूलचे प्रमुख डॉ. वर्गीस कुरियन यांनी ब्रॅंड मोहिमेची जबाबदारी दिली होती.