मुंबई – मला विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करा अशी मागणी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा नुकताच पार पडला असून, या निमित्ताने मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते उपस्थित होते.पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या समोर अजित पवारांनी विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त करण्याची मागणी करताच सर्वांच्या भुवया उंचावल्या.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याचे वक्तव्य केल्यापासून पक्षामध्ये अनेक बदल होताना दिसून येताहेत. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली होती. आता अजित पवार यांनी थेट विरोधी पक्षनेते पदावरून मुक्त होण्याची इच्छा व्यक्त करत पक्ष संघटनेमध्ये जबाबदारी हवी असल्याचे बोलून दाखवले आहे.
“मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार इंटरेस्ट नव्हता,आमदारांनी सह्या केल्या आणि नेत्यांनी देखील विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारण्यास सांगितलं म्हणून मी ती स्वीकारली असं अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी स्वीकारून मला एक वर्ष झालं आहे त्यादरम्यान काहींचं म्हणणं होत कि मी कडक वागत नाही.. आता कडक वागण्यासाठी एखाद्याची गचुंडी धरू का ? असं म्हणत मला या पदावरून मुक्त करून पक्ष संघटनेतीतील कोणतीही जबाबदारी द्या मग पक्ष कसा चालतोय तो पहा.. हा अधिकार नेतेमंडळींचा आहे परंतु माझी तशी इच्छा आहे असं स्पष्ट मत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केलं.
“आजपर्यंत पक्षाने जी जबाबदारी दिली ती मी योग्य पद्धतीने पार पाडलेली आहे. मला संघटनेत कोणतंही पद द्या.. तुम्हाला जे योग्य वाटेल ते द्या. त्या पदाला योग्य न्याय मिळवून देईन” असा विश्वास देखील यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला.