लातूर – जिल्हा प्रशासनाने लातूर शहरातील कॉफी शॉपसाठी नवीन नियमावली प्रसिद्ध केली आहे. ज्यात यापुढे आता कोणत्याही कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही. सोबतच प्रत्येक कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही असणे देखील बंधनकारक असणार आहे. विशेष म्हणजे या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या कॉफी शॉपवर कडक कारवाईचे धोरण अवलंबण्यात येणार आहे. प्रशासनाचा या निर्णयाचे लातूरकरांनी स्वागत केले आहे.
गेल्या काही दिवसांत लातूर शहरात कॉफी शॉपचे प्रमाण वाढले आहेत. तर या कॉफी शॉप वेगवेगळ्या थीमवर आधारित आहेत. मंद प्रकाश, अंधाऱ्या जागेतील गाण्याची सुरावट, तरुण-तरुणींना बसण्यासाठी निर्माण केलेले कंपार्टमेंट पाहायला मिळतात. कॉफी शॉपमध्ये कॉफी सोडून सगळे काही होते अशी चर्चा पाहायला मिळते.
तर अनेक अल्पवयीन तरुण-तरुणी प्रेमात पडल्यावर या कॉफी शॉपचा आसरा घेतात. याच कॉफी शॉपमध्ये मित्र मैत्रिणीचे वाढदिवसही साजरी केले जातात आणि संगीताच्या तालावर बेधुंद होऊन तरुण नाचतात. दरम्यान अशा कॉफी शॉपच्या विरोधात नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत होती.
राज्यात लातूर शहराला शैक्षणिक हब म्हणून ओळखले जाते. अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या इथे मोठ्याप्रमाणात आहे. तसेच एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. तालुक्याच्या भागातून शहरात येणाऱ्या तरुण-तरुणींची संख्या सुद्धा मोठी आहे.
मात्र अशात प्रेमी जोडप्यांना कुठेतरी आसरा घ्यावा म्हणून कॉफी सेंटरचा पर्याय असतो. त्यामुळे कोठेतरी यावर निर्बंध यायला पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती. पण याबाबत कायद्यात काही तरतुदी नसल्याकारणाने पोलिसांना थेट कारवाई करता येत नव्हती. यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे ही संपूर्ण बाब लक्षात घेत लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. आणि पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी आता नवीन नियमावली बनवल्या आहेत.
काय आहे नियमावली…
– कॉफी शॉपमध्ये अंधार करता येणार नाही
– स्वतंत्र कंपार्टमेंट करता येणार नाहीत
– धूम्रपणास बंदी राहिल.
– कॉफी शॉपमध्ये सीसीटीव्ही अनिवार्य असतील
– सर्वांचे चेहरे नीट दिसतील अशी प्रकाश योजना आवश्यक.