मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी विभाग (एनसीबी) काम करीत असून फडणवीस यांचे निकटवर्तीय कार्यालयात वावरत आहेत, असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. तसेच अमृता फडणवीस यांचे ड्रग्ज माफियाबरोबरचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर करत सोमवारी केले. यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावत नवाब मलिक आणि सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना अमृता फडणवीस यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले. सध्या त्यांच्या या वक्तव्याची फार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवरुन तुमच्यावर जाणीवपूर्वक आरोप केले जात आहेत का असे नवाब मलिक यांचे नाव घेत विचारले. त्यावेळी बोलताना अमृता यांनी, “नक्कीच जाणीवपूर्वक केलं जातंय. आमच्याकडे काहीच नाहीय जे ते एक्सपोज करु शकतात. आमच्याकडे ना लॅण्ड बँक आहेत, ना साखर कारखाने आहेत. त्यामुळे नॅचरली ते (विरोधक) आमच्यावर च***. आम्ही कोणाला घाबरत नाही तर च****,” असे उत्तर दिले. टीका करणार या शब्दाऐवजी अमृता यांनी प्रमाण भाषेत नसणारा खालच्या पातळीवरील शब्द पत्रकार परिषदेमध्ये वापरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मध्यस्थाचे काम करणाऱ्या नीरज गुंडे यांचे फडणवीस यांच्याशी संबंध असून ते एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या संपर्कात असतात. फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून एनसीबीची कारवाई सुरू असून मोठे मासे बाहेरच असल्याचा आरोप मलिक यांनी केला.
मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलधर हे वैधानिक पदावर असताना समीर वानखेडे यांची भेट घेऊन प्रसिद्धी माध्यमांमधून वक्तव्ये करत आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.