पुणे – दरवर्षी दिवाळीच्या एक दिवस आधी ‘धनत्रयोदशी’ सण साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार धनत्रयोदशी कार्तिक महिन्यात कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी केली जाते. यालाच धनत्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती असेही म्हणतात.
या दिवशी धन, लक्ष्मी, कुबेराची पूजा केली जाते. शिवाय देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस. धन आणि आरोग्य देणाऱ्या देवतांची पूजा एकाच दिवशी करणारे तुम्ही-आम्ही “आरोग्यम् धनसंपदा’ म्हणजे आरोग्य हीच संपत्ती आहे’. असं मानतो.
देशात सध्या कोरोनाची लाट ओसरत असली तरी कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून यंदा पूर्वीच्याच उत्साहात दिवाळी साजरी केली जात आहे. सोमवारी बसुबारस साजरी केल्यानंतर आज मोठ्या उत्साहात धनत्रयोदशी साजरी केली जात आहे. तर जाणून घ्या घेऊयात धनत्रयोदशीची प्रथा, पूजा, विधी आणि शुभ मुहूर्त….
धनत्रयोदशी 02 नोव्हेंबर 2021 रोजी (मंगळवार) सकाळी 11.31 पासून साजरी केली जाईल. तर 03 नोव्हेंबर 2021 (बुधवारी) सकाळी 09:02 पर्यंत समाप्ती होईल. या दिवशी पूजेचा एकूण कालावधी 01 तास 54 मिनिटे असेल.
धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी शुभ मुहूर्तावर उत्तरेकडे कुबेर आणि धन्वंतरीची स्थापना करावी. यासोबतच देवी लक्ष्मी आणि श्री गणेश यांच्या मूर्ती किंवा प्रतिमांचीही स्थापना करावी. यानंतर दिप प्रज्वलीत करावा आणि विधिवत पूजा सुरू करावी.
धन देवतांना तिलक लावल्यानंतर फुले फळे इत्यादी अर्पण करावे कुबेराला पांढरी मिठाई आणि भगवान धन्वंतरी यांना पिवळी मिठाई अर्पण करावी. आणि ईश्वराचे नामस्मरण करावे.
दिवाळीत दिव्यांची आरास लावून, आकर्षक रोषणाई करत, फराळ या गोष्टींसह उत्साह आनंद साजरा केला जातो. दीपावलीची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण या एकामागोमाग असतात.