अफगाणिस्तानातील अमेरिकेचे सैन्य 11 सप्टेंबरपासून माघारी

वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या दहशतवादी हल्ल्‌याला 20 वर्षे पूर्ण

वॉशिंग्टन – यावर्षी 11 सप्टेंबर पासून अफगाणिस्तान मधून अमेरिकेचे उर्वरित सर्व सैन्य माघारी घ्यायला सुरुवात होईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे. न्यूयॉर्क मधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींवर 2001 साली झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्‌याला या वर्षी 20 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच दिवशी म्हणजे 11 सप्टेंबरला अफगाणिस्तानातून सैन्य मागे घ्यायला सुरुवात होईल.

त्याबरोबरच अफगाणिस्तानमधील युद्धाची औपचारिक समाप्तीची घोषणाही होईल, असे बायडेन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. अफगाणिस्तानमध्ये सध्या अमेरिकेचे अडीच हजार सैनिक आहेत. अमेरिका आणि अन्य सहकारी देशांचे सैन्य माघारी घेण्याबाबत समझोत्याचे एक वेळापत्रक बायडेन जाहीर करणार आहेत, असे व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिव जेन पास्की यांनी मंगळवारी सांगितले.

अफगाणिस्तानातील माघारी घेण्याचे बायडेन यांनी यापूर्वीच निश्‍चित केले होते. हे सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया 1 मे पासून सुरू होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अमेरिकेचे सैन्य मागे घेण्याबाबत कोणतीही पूर्व अट नाही. या संदर्भातील आढावा बायडेन यांनी यापूर्वीच घेतला आहे. अफगाणिस्तान मधील परिस्थिती कदाचित अशीच कायम स्वरूपी ही राहू शकते. पण आता अमेरिकेचे सैन्य तेथे राहणार नाही, असे पास्की यांनी सांगितले. अमेरिकेच्या लष्करी सहाय्याची अफगाणिस्तानला आता आवश्‍यकता नाही. मात्र शांतता प्रक्रियेतील सहभागी म्हणून अमेरिका नेहमीच उपलब्ध असेल. असे जेन पास्की म्हणाल्या.

अमेरिकेच्या संसदेतील, नाटो सहकारी देशांचे, आंतरराष्ट्रीय भागीदार देशांचे सुमारे डझनभर प्रतिनिधी परराष्ट्रमंत्री अँटनी यांना अलीकडेच भेटले आहेत. त्यांनी अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेण्याबाबत अनुकूल मत दिले आहे. ब्लिंकन यांनी अलीकडेच कॅनडा, नेदरलॅन्ड, जर्मनी, फ्रान्स, इटली, नॉर्वे, तुर्की आणि ब्रिटनच्या परराष्ट्रमंत्र्यांबरोबर तसेच अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांच्याशीही चर्चा केली आहे. युरोपियन संघाच्या उच्चपदस्थ आणि नाटोचे सरचिटणीस स्टोल्टेनबर्क यांच्याशीही ब्लिंकन यांची चर्चा झाली आहे. अफगाणिस्तानातील सैन्य माघारी घेण्याबाबत रिपब्लिकन पक्षाने मात्र टीका केली आहे. तेथील पूर्ण सैन्य मागे घेणे धोकादायक आहे असे सिनेटर लींडसे ग्राहम यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.