श्रीनगर – हिमालयीन शिखरांवरील बर्फ वितळण्यास प्रारंभ झाल्याने पाकिस्तानकडून घुसखोरीची वाढती शक्यता पाहता भारतीय सैन्याने महत्त्वाची पावले उचलली आहेत. सीमावर्ती भागांमध्ये घुसखोरविरोधी व्यवस्था बळकट करण्यासाठी आधुनिक रायफलने सज्ज प्रशिक्षित स्नायपर्स तैनात करण्यात आले आहेत. या स्नायपर्सना अमेरिका आणि इटलीच्या सैन्यतज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे.
सैन्याच्या बटालियन्समध्ये तैनात काही सैनिकांसह विशेष सुरक्षा पथकांना विदेशातून पाचारण करण्यात आलेल्या तज्ज्ञांनी या अत्याधुनिक रायफल्स आणि त्यात स्थितीनुरूप वापरल्या जाणाऱ्या दारूगोळ्याबद्दल प्रशिक्षण दिले आहे. नव्या स्नायपर रायफल्स सैनिकांकडे यापूर्वी उपलब्ध रशियन द्राग्नोव्हच्या तुलनेत अधिक घातक आणि सक्षम आहेत. त्यामुळे घुसखोरावर चांगलाच वचक बसणार आहे.