डिंभे -आंबेगाव तालुक्याची करोना मुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. 44 करोनाबाधित व्यक्तिंपैकी 37 पॉझिटिव्ह व्यक्तिंचा निगेटीव्ह आला आहे. एका व्यक्तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर 17 करोना बाधित गावांपैकी सद्यस्थितीत तेरा गावे करोनामुक्त झाली असून सहा करोना बाधित व्यक्तिंवर उपचार चालू असल्याचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी सांगितले.
तालुक्यातील पेठ, मंचर, निरगुडसर, शिनोली, साकोरे, पिंगळवाडी (लांडेवाडी), घोडेगाव, जवळे, एकलहरे, वळती, फदालेवाडी/उगलेवाडी, नारोडी व अवसरी बुद्रुक ही तेरा करोना बाधित असलेली गावे करोनामुक्त झाली आहे. तर गिरवली तीन, वडगाव काशिंबेग एक, पारगाव एक व चपटेवाडी एक या विविध गावांतील सहा करोना बाधित व्यक्तिंवर उपचार चालू आहे.
सर्वात दोनपेक्षा जास्त रूग्ण वळती, वडगाव काशिंबेग, गिरवली, पेठ, निरगुडसर, फदालेवाडी/उगलेवाडी व शिनोली या भागात सापडले आहेत. प्रांत अधिकारी जितेंद्र डुडी, तहसीलदार रमा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्यसेवक, आशा कर्मचारी, आरोग्य सेविका, पोलीस निरीक्षक कृष्णकांत खराडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार, ग्रामस्तरीय समिती आदिंनी समन्वयाने काम करून तालुका करोनामुक्तीकडे नेला आहे.