पुणे – मिहिका पाठक, शौर्या रोळे, सोयरा शेलार यांनी हवेली तालुका बॅडमिंटन संघटनेच्या वतीने अमनोरा-पीवायसी एचटीबीए कप जिल्हा मानांकन बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
पीवायसी हिंदू जिमखान्याच्या बॅडमिंटन कोर्टवर ही स्पर्धा सुरू आहे. स्पर्धेचे उदघाटन पीवायसीचे शेखर नानिवडेकर, एचटीबीएचे अध्यक्ष अविनाश जाधव, कॉर्पोरेट ॲथलीटसचे संस्थापक अभिजित चांदगुडे , पीवायी हिंदू जिमखान्याचे सचिव सारंग लागू, तन्मयी आगाशे, विजय कोकमठणकर यांच्या उपस्थितीत झाले.
या स्पर्धेतील पंधरा वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या सलामीच्या लढतीत मिहिकने अदिती गिरीवर २१-१०, २२-२०, २१-१७ असा, तर शौर्याने वीरा पानसेवर २१-१२, २१-१० असा विजय मिळवला. यानंतर सोयराने रेमा घागवर २१-५, २१-६ अशी, तर समीक्षा दोडकेने पलक धनगरवर २४-२२, २१-१८ अशी मात केली.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत पार्थ देशपांडेने शैलेश स्वामीवर २१-१५, २१-१३ अशी, विपूल अन्वेकरने जतिन ठक्करवर २१-१६ १७-२१, २१-१८ अशी, तर शौनक कुलकर्णीने हिमांशी हरदेववर २१-१९, २१-१३ अशी मात केली. जयंत कुलकर्णीने श्रीवांश जाजूवर २१-१६, २१-११ असा, प्रणव गावडेने अविष्का मसालवर २१-१४, २१-८ असा, तर अथर्व खिस्तीने कीर्तन सेरालतानवर २१-१६, २१-१३ असा विजय मिळवला.