आई-वडीलांसह 7 जणांची हत्या करणाऱ्या शबनमला दिली जाणार फाशी; वाचा देश हादरवून सोडलेल्या हत्याकांडाबाबत…

मथुरा – उत्तर प्रदेशातील मथुरा येथील तुरूंगात एका महिलेला फाशी दिली जाणार असून त्याकरता तुरूंग प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. शबनम ( shabnam case ) असे संबंधित महिलेचे नाव असून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच एका महिलेला फाशीची शिक्षा दिली जात आहे.

आपल्या प्रियकराच्या मदतीने आई-वडीलांसह आपल्याच कुटुंबातील सात जणांची हत्या केल्याचा शबनमवर आरोप सिध्द झाला असून ती उत्तर प्रदेशच्या अमरोहा ( shabnam case amroha ) येथील रहिवासी आहे. एप्रिल 2008 मध्ये प्रियकर सलीमच्या मदतीने तिने कुटुंबातील सात जणांची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली होती.

निर्भया हत्याकांडातील दोषींच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करणारा पवन जल्लाद हाच शबनमच्या शिक्षेची अंमलबजावणी करणार असून मथुरा तुरूंग प्रशासनाने त्याला पाचारण केले आहे. त्याने तुरूंग स्थळी येउन पाहणीही केली असल्याचे सांगण्यात आले.

शबनम आणि तिच्या प्रियकराला ( shabnam lovers amroha ) हत्येच्या आरोपात दोषी ठरवण्याच्या निर्णयाला तिने न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवला होता. या दोघांनी राष्ट्रपतींकडेही दया याचिका दाखल केली होती. पण ती फेटाळण्यात आली होती. सध्या देशात मथुरा येथील कारवासातच महिलांना फाशीची शिक्षा दिली जाउ शकते अन येथे फाशी दिली जाणारी शबनम पहिली महिला ठरणार आहे. ( shabnam case )

शबनमचे वडील शौकत अली एक शिक्षक होते. शबनम त्यांची एकुलती एक कन्या होती. मात्र प्रेमात आंधळ्या झालेल्या शबनमने 14 एप्रिल 2008 रोजी सलीमच्या मदतीने आपल्याच कुटुंबातील सात जणांची निर्घृण हत्या केली. त्यात दहा महिन्याच्या भाच्यालाही तिने निर्दयपणे ठार केले होते. देशात अशा प्रकारची ही पहिलीच घटना घडल्यामुळे संपूर्ण देश हादरला होता. आता घटनेच्या 13 वर्षांनी तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

अमरोहा जिल्ह्यातील बावनखेडी या गावात त्या रात्री एका मुलीचा मोठ्याने रडण्याचा आवाज आल्यानंतर शेजारी जागे झाले व त्यांनी त्या घराकडे धाव घेतली. घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले सात मृतदेह त्यांना दिसले व ही मुलगी रडत होती. एकाच कुटुंबातील सगळ्यांची निर्दयपणे हत्या झाल्यामुळे मथुरापासून लखनौपर्यंतचे प्रशासन हादरले. देशही या घटनेने सुन्न झाला व सगळे शबनमला धीर देण्याचा प्रयत्न करत होते. दरोडेखोरांनी हे कृत्य केले. आपण बाथरूममध्ये होतो त्यामुळे वाचलो असे रडणाऱ्या शबनमने तेव्हा पोलिसांना सांगितले. ( shabnam case )

पोलिसांनी तपास सुरू केल्यावर त्यांना दरोडेखोरांची स्टोरी विसंगत वाटत होती. मग त्यांनी पुन्हा घटनास्थळावरच आपला तपास केंद्रीत केला. मारल्या गेलेल्या व्यक्तींपैकी कोणी बचावाचा प्रयत्नही केला नसल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे शंका निर्माण झाली. दरोडेखोर काही लुटायला आले होते असेही तपासात आढळून आले नाही. त्यानंतर शवविच्छेदनाच्या अहवालात सगळा उलगडा झाला. ठार झालेल्यांना अगोदर काहीतरी औषध देउन बेशुध्द करण्यात आले होते असे निष्पन्न झाले.

शबनमवर संशयाची सूई स्थिरावली आणि तिच्या मोबाइलचे कॉल डिटेल्सही तपासण्यात आले. एकाच नंबरवर तिने वारंवार कॉल केल्याचेही निष्पन्न झाले आणि तिच्या प्रियकरालाही ताब्यात घेण्यात आले. दोघांनी गुन्हा कबुल केला. ( shabnam case )

धर्म, समाज यांचा विरोध पत्करून शिक्षकाने आपल्या मुलीला शिकवले. तिच्या स्वत:च्या पायावर उभे केले. मात्र ती एका कमी शिकलेल्या मुलाच्या प्रेमात पडली आणि लग्नाला होणारा विरोध संपवण्यासाठी तिने अख्खे कुटुंबच संपवले. या घटनेमुळे तेव्हाही नातेसंबधांतील विश्‍वासार्हतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले होते. जे आजही कायम आहे, असे समाज शास्त्रज्ञांचे मत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.