पुणे – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कॅन्टोन्मेंट हद्दींतही दि.23 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन पाळला जाणार आहे. यात पुणे कॅन्टॉन्मेंट, खडकी आणि देहूरोड हद्दींचा समावेश आहे. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार यांनीही याबाबत आदेश काढले आहेत.
या कालावधीत दि. 14 ते 18 जुलैदरम्यान सर्व किराणा दुकाने, होलसेल मार्केट, बाजार, फळ विक्रेत्यांची दुकाने, मटण, चिकन व मासळी विक्री, ई-कॉमर्स सेवा बंद राहतील. तर, दि. 19 ते 23 जुलैदरम्यान सकाळी 8 ते 12 या वेळेत ही दुकाने व सेवा खुली करण्यास बोर्डाने मुभा दिली आहे. खाद्यपदार्थांची ऑनलाइन डिलिव्हरी, हॉटेल, लॉज, बार, केश कर्तनालये, सलून, स्पा, ब्युटी पार्लर, शाळा, महाविद्यालयांसह सर्व प्रकारच्या शिकवण्या, क्लास बंद राहणार आहे.
हे राहणार सुरू
– दूध विक्री आणि घरपोच घरगुती गॅस वितरण
– सरकारी व खासगी वैद्यकीय, पशुवैद्यकीय सेवा, रुग्णालये, मेडिकल
– दहा टक्के मनुष्यबळासह केंद्र व राज्य सरकारची कार्यालये, न्यायालये व बॅंका
– मुंढव्यातील औद्योगिक परिसरातील उद्योग
– पेट्रोल पंप (सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत)