लॉकडाऊन काळात काम पूर्ण करण्याचे “प्लॅनिंग’
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्त्यावरील उड्डाणपूल पाडण्याची तयारी पूर्ण झाली असून, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, “पीएमआरडीए’चे आयुक्त सुहास दिवसे आणि पोलीस आयुक्त के. वेंकटेशम यांच्या संयुक्त पाहणीनंतर येत्या दोन दिवसांतच पूल पाडण्याच्या कामाला सुरूवात केली जाणार आहे.
दहा दिवसांच्या लॉकडाऊनच्या कालावधीचा वापर “पीएमआरडीए’कडून पूल पाडण्यासाठी केला जाणार आहे. लॉकडाऊन असल्याने वर्दळ कमी असणार आहे. त्यामुळे वाहनांना कोणताही धोका संभवणार नाही आणि पाडकामात कोणताही अडथळा येणार नाही, असे प्रशासनाने म्हटले आहे.
पूल पाडण्यासाठी महापालिकेने अटी शर्तीसंह नुकतेच ना हरकत प्रमाणपत्र “पीएमआरडीए’ला दिले आहे. यामध्ये “वाहतुकीचे नियोजन आधी करा, तसेच पुलाचा आराखडा तयार करा आणि मगच पाडकामाला सुरुवात करा,’ अशा अटी महापालिकेने ठेवल्या होत्या. शिवाय पाडकाम आणि नवा पूल उभारण्यातील खर्चाचा कोणताही हिस्सा महापालिका देणार नाही. तसेच पाडकामातील राड्यारोड्याची विल्हेवाटही “पीएमआरडीए’नेच लावायची आहे. याचाही अटींमध्ये समावेश आहे. त्याला “पीएमआरडीए’ने सहमती दर्शवली आहे.
या पाडकामासाठी “पीएमआरडीए’ मशिनरी आणि जेसीबी तसेच अन्य सामग्री आणून ठेवली आहे. आयुक्तांची संयुक्त पाहणी झाल्यानंतर लगेचच कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे “पीएमआरडीए’चे महानगर नियोजनकार विवेक खरवडकर यांनी सांगितले.
गरजेनुसार वाहतुकीचे नियोजन
विद्यापीठ रस्त्यावरील वाहतूक वळवण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक रस्ता दिला आहे. याशिवाय ज्या ज्या ठिकाणचे काम करणार त्यावेळी त्या परिस्थितीनुसार रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन करण्यात येणार आहे.