दोन दुकानदारांसह 37 जणांवर राजगड पोलिसांत गुन्हा दाखल
कापूरहोळ (वार्ताहर) – करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग करून नियमांची पायमल्ली करीत दुकानासमोर ग्राहकांची गर्दी केल्याप्रकरणी राजगड पोलिसांनी नसरापूर (ता. भोर) बाजारपेठेतील दोन दुकानदारासह दिवसभरात 37 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. व्यापारी वर्गाला वारंवार सूचना करूनही नियमांची पायमल्ली होत असल्याचे पोलिसांच्या नजरेस येत असल्याने पोलिसांनी नसरापूर बाजारपेठेत कारवाईची मोहीम हाती घेतली असल्याचे राजगड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी सांगितले आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नसरापूर (ता. भोर) येथील दुकानांसह इतर 37 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. सामान खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. यावेळी दुकानामध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळण्यात आले नव्हते. दोन्ही दुकान मालकांवर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. राजगड ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन रावते, सुधीर होळकर यांनी गस्त घालून ही कारवाई केली आहे.
नसरापूर, कापूरहोळ, किकवी, सारोळा, खेड शिवापूर, कोंढणपूर फाटा येथील सर्व व्यापारी आणि दुकानदारांनी शासनाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही प्रकारे नियमांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुकानामध्ये अनावश्यक गर्दी झाल्यास तसेच सोशल डिस्टन्सिंगचा भंग केल्यास त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्यास तोंडावर मास्क घालूनच घराबाहेर पडावे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणते आस्थापना, दुकाने उघडून विनाकारण गर्दी केल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी दिली आहे.