पाटण – गेल्या अनेक महिन्यांपासून पाटण तालुक्यातील महिलांचे दागिने मोटर सायकलवरुन येऊन हिसकावून लूट करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगारास पाटण पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. दरम्यान, आणखी दोघांना या प्रकरणी मदत केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
यांच्याकडून मोटरसायकलसह एकूण 7 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला असून यामध्ये अठरा तोळे सोन्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. लक्ष्मण चंद्रकांत चाळके, अतुल अरविंद कावरे व अजिंक्य विजय मळगावकर सर्व रा. आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबतची सविस्तर माहिती पाटण येथील पत्रकार परिषदेत देताना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील म्हणाले, 16 सप्टेंबर रोजी दौलतनगर (मरळी), ता. पाटण येथे वत्सलादेवी इंग्लिश मीडिम स्कूलमध्ये पालक मिटिंग करता एक महिला आपल्या मुलीसह शाळेत गेली होती. शाळेतून परत येताना दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पायी चालत असताना कमानीजवळ पाठीमागून लाल-काळ्या रंगाची मोटर सायकल वरुन आलेल्या इसमाने सदर महिलेच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण व एक तोळ्याचे मिनी गंठण अशी दोन्ही मिळून 61 हजार रुपये किंमतीचे दागिने जबरदस्तीने गळ्यातून ओढून
मोटारसायकलवरुन पोबारा केला होता. फिर्यादीच्या तक्रारीवरुन घटनास्थळावर असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपास केला असता फोटो प्राप्त झाला. त्यानुसार पोलिसांनी खबऱ्याद्वारे माहिती काढून संशयित आरोपी हा आंबेघर तर्फ मरळी, ता. पाटण येथील जावई असल्याचे समजले. आरोपी लक्ष्मण शेळके याच्या आष्टा येथील घरी जाऊन शोध घेतला असता तो सापडला नाही. परंतु त्याची लाल-काळ्या रंगाची पल्सर गाडी पोलिसांना मिळाली. नंतर पोलीस वेळोवेळी लक्ष्मण शेळके याचा शोध घेत होते.
अखेर गेल्या काही दिवसांपूर्वीच लक्ष्मण चाळके याला पोलिसांनी सापळा लावून त्याच्या राहते घराजवळून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता चोरलेले दागिने विकणे व लपवून ठेवणे याप्रकरणी मदत केल्याबद्दल अतुल कावरे आणि अजिंक्य मळगावकर यांनाही पोलिसांनी अटक केली.लक्ष्मण चाळके याने आज अखेर पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिक्षी, विहे, चोपदार वाडी या गावातील महिलांचे दागिने गळ्यातून हिसकावून नेल्याचे उघड झाले आहे.
तसेच कराड तालुक्यात त्याच्यावर एक गुन्हा दाखल आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वडगाव, कोडोली, शाहूवाडी येथे पाच ठिकाणी आरोपी लक्ष्मण चाळके याने अशाच प्रकारे चैन स्नॅचिंग करुन लूटमार केल्याचे उघड झाले आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांचे मार्गदर्शनाखाली पाटण पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व त्यांच्या पथकाने करुन आरोपीला जेरबंद करण्यास यश मिळवले.