कराड – संक्रांतीच्या सणाला माहेरी आलेल्या विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. शेरे, ता. कराड येथे मंगळवारी दुपारी दोन वाजता ही घटना उघडकीस आली. सौ. अमृता योगेश जगताप (वय 22, रा. वडगाव हवेली (कोडोली फाटा), ता. कराड) असे विवाहितेचे नाव आहे.
याप्रकरणी विवाहितेचे चुलते तानाजी धोंडीराम जाधव यांनी कराड तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, विवाहित अमृता हिचे सासर हे असून तिचा विवाह 22 डिसेंबर रोजी पार पडला होता. दि. 12 जानेवारी रोजी त्या संक्रातीच्या सणानिमित्त माहेरी आले होते. आज सकाळी 11 वाजल्यापासून अमृता या घरात नव्हत्या.
दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अमृता यांचे चुलते तानाजी जाधव यांना घरातील महिलांनी अमृता या सकाळी बाहेर पडल्या होत्या.त्या अजून घरी आल्या नाहीत अशी माहिती फोनवरून संगीतली. जाधव यांनी तत्काळ त्यांचा मुलगा अविनाश याला अमृता यांचा शोध घेण्यास सांगितले. अविनाशने परिसरात शोध घेऊन ही अमृता सापडल्या नाहीत. शेवटी अविनाशने त्यांच्याच घराजवळील विहिरीकडे जाऊन पाहणी केली असता, त्या विहिरीत अमृता यांचा मृतदेह तरंगताना आढळला.
याबाबतची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. संक्रांत व भोगीच्या सणा दरम्यानच नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.