पुणे- शहरातील “ओमायक्रॉन’ पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील कुटुंबियांसह ते ज्या ठिकाणी राहतात त्या गृहनिर्माण सोसायटीतील सर्वांची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा जीव भांड्यात पडला आहे.
मुंबईमध्ये नायजेरियातून आलेल्या एक महिला आणि दोन मुलींमुळे त्यांच्या कुटुंबियातील आणखी तीनजणांना “ओमायक्रॉन’ची लागण झाली होती. मात्र पुण्यातील “ओमायक्रॉन’ बाधिताचे कुटुंबिय मात्र सुरक्षित असल्याने महापालिकेने सुस्कारा सोडला आहे.
त्याच्या निकटवर्तीयातील 13 आणि गृहनिर्माण सोसायटीतील 25 जणांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली. त्यांची टेस्ट ताबडतोब करण्याची विनंती महापालिकेने “एनआयव्ही’ला केली होती. त्यांच्या टेस्टचा अहवाल आला असून, सर्वांचे करोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत. हा पुणेकरांसाठी दिलासा असल्याची प्रतिक्रिया महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. कालच्या नकारात्मक बातमीनंतर मिळालेला हा दिलासा असून, नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळू नयेत, हीच अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया मोहोळ यांनी दिली आहे.