पुणे – परदेशांतून आलेल्या आणि करोना पॉझिटिव्ह किंवा ओमायक्रॉन बाधित नागरिकांना क्वारंटाइन करण्यासाठी महापालिकेला हॉटेल मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यसरकारच्या गाइडलाइन्सप्रमाणे परदेशातून आलेल्या नागरिकांना “कोविड केअर सेंटर’ मध्येच क्वारंटाइन करावे लागणार आहे.
दुसऱ्या लाटेवेळी लॉकडाऊनच असल्याने हॉटेलव्यवसाय बंद होता. ज्या ठिकाणी लॉजिंग बोर्डिंग होते त्या हॉटेलचालकांनी मेन्टेनन्सचा खर्च निघावा यासाठी संपूर्ण हॉटेल क्वारंटाइन सेंटर केले होते. त्याठिकाणी राहण्याशिवाय खानपान सेवेचे पैसेही आकारले होते. मात्र, निर्बंध शिथील झाल्यानंतर हॉटेलचालकांनी पुन्हा एकदा जम बसवायला सुरूवात केली. अशा परिस्थितीत पुन्हा “ओमायक्रॉन’ संशयितांना येथे ठेवण्याला ते तयार नाहीत.
पुण्यात “ओमायक्रॉन’ पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तीला क्वारंटाइन करण्यासाठी हॉटेल शोधण्याला महापालिकेला मोठी कसरत करावी लागली. अखेर आयुक्तांनी त्यांचे वजन वापरून हॉटेलमधील एका रुमची सोय केली. परंतु सद्यस्थितीत संपूर्ण हॉटेलच क्वारंटाइन सेंटरसाठी द्यायला हॉटेलचालकांची तयारी दिसत नाही.